Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री थेट मैदानात उतरणार; अमित शाह 18, 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर
एकीकडे पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा आहे आणि त्यातच या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री थेट मैदानात उतरणार आहेत.
Pune Bypoll Election : एकीकडे पुण्यातील कसबा (Pune ByPoll Election ) आणि चिंचवड पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा आहे आणि त्यातच या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांनादेखील उपस्थित राहणार आहे.
अमित शहा 18 आणि 19 फेब्रुवारीला पुण्यात आहेत. 18 तारखेला अमित शाहांच्या हस्ते 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर 19 तारखेला अमित शाह हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी महत्वाची आहे. या पोटनिवडणुकीकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात अमित शहा पुण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवाय कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी जगतापदेखील उपस्थित राहणार आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा हा दौरा आखण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीयांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यांनीदेखील आवाहन केलं होतं. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वांनी कंबर कसली आहे. त्यातच अमित शाहांनीदेखील या निवडणुकीत लक्ष घातल्याचं दिसत आहे.
शिवसृष्टीचं लोकार्पण करणार
अमित शाह शिवसृष्टीचं लोकार्पण करणार आहेत. शिवसृष्टीचं हा प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाड्याचे लोकार्पण शाह करणार आहेत. सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड–किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात आले आहेत.