Ajit Pawar: बारामतीतील PDCC बँक रात्री उघडल्याच्या प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'बॅंक माझ्या मार्गदर्शनाखाली चालत...'
Ajit Pawar: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाल्याचे दिसून आले. आज मतदान पार पडत आहे.

बारामती: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाल्याचे दिसून आले. आज मतदान पार पडत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी (PDCC Bank) बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला होता. याच बँकेत (PDCC Bank) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला होता. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक (PDCC Bank) का उघडी ठेवण्यात आली असा सवाल सहकार बचाव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता, या घटनेवरती आज माध्यमांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ज्याच त्याला लखलाभ मला त्यात पडायचं नाही, म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या दिवशी आचारसंहिता सुरू झाली त्या दिवसापासून शरद संकुल याठिकाणी त्यांचा अड्डा तिथेच आहे. ज्याच त्याला लखलाब मला त्यात पडायचं नाही. पीडीसीसी बँकेत निळकंठेश्वर पॅनलचा एक तरी सदस्य होता का. जी कोणी असेल त्यांना प्रश्न विचारा. आताही चला शरद संकुल तिथे लोक बसलेले असतील. सहकाराच्या नियमात आचारसंहितेच्या काळात कोणालाही त्या ठिकाणी बसता येत नाही. तिथे बसून त्यांचा प्रचार करता येत नाही, याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तिथे बसूनच राजकारण चाललं होतं. मला रात्री फोन आलेला दादा तिथे स्कॉड पाठवा, बघा काय चाललं आहे तिथे, पण मी म्हटलं आपल्याला काय करायचंय ज्याचं त्याला लखलाभ, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
पीडीसीसी बॅंक माझ्या मार्गदर्शनाखाली चालत नाही. मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा बहुतेक दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिलेला आहे. त्याला दीड दोन वर्षे झाली असतील. तसं पाहिलं तर मी त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे. त्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळते. माझा काहीही संबंध नाही. तरी देखील कोणाला काय वाटत असेल तर चौकशी करणे हे प्रत्येकाचं काम आहे. त्याची चौकशी करावी. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भात प्रश्न विचारता तसंही समोरच्या पॅनलचा सगळंच राजकारण शरद संकुलमध्ये चालतं. त्यांनाही तिथं नियमाने पतसंस्था आणि विकास सोसायटी, दूध सोसायटी आहे त्यामुळे तिथे बसता येत नाही. तीन संस्था असताना तिथे इतर कोणाला बसता येत नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथेही सील ठोकलं असतं, ते सगळेजण तिथेच असतात, तो त्यांचा अड्डा आहे. तिथेच त्यांनी ऑफिस बनवलं आहे, पण मला तसल्यात पडायचं नाही, ज्याच त्याला लखलाभ सारखं सारखं पीडीसीसी बँक बोललं जातं, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
मी निळकंठेश्वर पॅनल उभा केला. त्या पॅनलचा एक तरी सदस्य पीडीसीसी बँकेच्या इथे होता का? तिथे एक तरी सदस्य माझा उपस्थित होता का? तिथे कोणीही नव्हतं जर कोणी असेल तिथे उपस्थित तर त्यांना प्रश्न विचारा. आता इथे लोक बसलेले असतील पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कोणालाही बसता येत नाही. तिथे बसून पॅनलचा प्रचार करता येत नाही. यंत्रणा राबवता येत नाही. याद्या करता येत नाहीत. इतरही गोष्टी करता येत नाहीत. मला रात्री देखील फोन आले दादा तिथे स्कॉड पाठवा बघा तिथे काय सुरू आहे, तर मी म्हटलं काही गरज नाही. ज्याचं त्याला लखलाभ असंही पुढे अजित पवार यांनी म्हटलं आहे.


















