Pune MNS : पुण्यात मुंब्रा घटनेची पुनरावृत्ती! 'नहीं बोलता मराठी...', वाकडेवाडीत एअरटेल टीम लीडरची अरेरावी, मनसेने धू धू धुतलं
Pune MNS : वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला. मनसे कार्यकर्त्यांनी मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्य टीम लीडरला मनसे स्टाईल चोप दिला आहे.
पुणे: मुंबई, कल्याण, ठाण्यानंतर आता पुण्यातही मराठी-हिंदी (Marathi Vs Hindi) वादाला तोंड फुटल्याचं चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात काल फळ विक्रेत्याबरोबर झालेल्या वादातून जमावाकडून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्याचा संतापजनक प्रकार घडला त्यानंतर मनसे आक्रमक झाली. आता पुण्यातील (Pune) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला. मनसे (Pune MNS) कार्यकर्त्यांनी मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्य टीम लीडरला मनसे स्टाईल चोप दिला आहे.
नेमकं काय घडलं?
ठाण्यानंतर आता पुण्यात हिंदी-मराठी वरून वाद पेटला असल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील एअरटेल टिम लीडर शाहबाज अहमद याला मनसे स्टाईल चोप दिल्याची घटना समोर आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप दिल्याची माहिती आहे.
मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल...
एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल. सणांना सुट्टी न देणे, तसेच गेले 3महिने सदर मराठी कर्मचाऱ्यांचा पगार त्याने केला नाही. त्यावर येथील कामगारांनी मनसेकडे तक्रार केली. आमचा पगार थांबवला आहे, म्हणून त्या शाहबाज अहमदने आपल्या मराठी पोरांना धमकी दिली की कोनसी भी सेना लेके आओ नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय. या मराठी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला आज मनसेने वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत, अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील तीन एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसेकडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला चांगलाच चोप दिला आहे. पुणे वाकडेवाडी येथे एअरटेल शोरुम आहे. तिथली ही घटना आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाहबाज अहमद नावाच्या टिम लीडरला बेदम चोप दिला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार देण्याच्याही सूचना यावेळी मनसेने दिल्या आहेत.
मुंब्य्रात मराठी तरुणाला माफी मागायला लावली
मुंब्य्रामध्ये विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळे विकत घेण्यासाठी एका विक्रेत्याकडे गेला. विशालने मराठीत फळांचा भाव विचारला त्यावर फळविक्रेता शोएब कुरेशी संतापला आणि म्हणाला, मला मराठी येत नाही, तू हिंदीत बोल. विशाल गवळीने महाराष्ट्रात राहून तुला मराठी का येत नाही, असं विचारलं. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे भांडणात रूपांतर होत असतानाच मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. त्यानंतर त्याला कान पकडत माफी मागायला सांगितली. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.