(Source: ECI/ABP News/ABP Majha)
bopdev ghat incident: बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्याप फरार; शरद पवार, सुप्रिया सुळेंनी केली घटनेची पाहणी, म्हणाल्या, पाच दिवस उलटूनही...
bopdev ghat incident: ही घटना घडली त्याठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली आहे.
पुणे: काही दिवसांपुर्वी पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, या घटनेने नागरिकांनी, राजकीय नेत्यांनी, अभिनय क्षेत्रातील व्यक्तींनी देखील प्रतिक्रिया दिली होती, या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत, यातील दोन आरोपीचे स्केच देखील पोलिसांनी शेअर केले आहेत, तर आरोपींबाबत काही माहिती असेल तर ती कळवल्यास त्यांना इनाम देण्यात येईल अशी घोषणा देखील पोलिसांनी केली आहे, या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपींना शोधण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ही घटना घडली त्याठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली आहे.
शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपेदेव घाट परिसरात ज्या ठिकाणी पाच दिवसांपूर्वी 21 वर्षीय एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. पाच दिवस उलटूनही आतापर्यंत आरोपीपर्यंत पोलिसांना का पोहोचता आलेलं नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तपासात काय अडचणी येतात याबाबत देखील पवारांनी बड्या अधिकाऱ्यांना विचारलं. त्याचबरोबर या प्रकरणातील माहिती देखील जाणून घेतली. पुण्यात महिला ,मुली सुरक्षित आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या
चौकीत पोलिस नाहीत हा प्रॉब्लेम मला शहरात अनेक ठिकाणी येतो. वर्दीची भीती नसल्याने क्राईम वाढत आहे. पोलिसांना लिंक लागत नाही त्यामुळे आरोपी सापडत नाहीत. इथ जातं येता कुठलाच कॅमेरा नाही, चौकी आग्रहाने मागितली होता, ब्लॅक स्पॉट आहे, टेक्निकल लोक कमी आहेत. ज्या दिवसापासून घटना बोपदेव घाटात ही घटना घडली, त्या दिवसापासून रोज मी एसपी आणि सीपी दोघांशी बोलत आहे,एसपीचा पण यात थोडा भाग येतो. पाच दिवस झाले आरोपी सापडत नाहीत गंभीर आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे, रात्री अपरात्री तिकडून अनेकजण जात असतात, दोघे बसले होते, त्यावेळी त्या तरूणीसोबत सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला ही दुर्दैवी घटना आहे, असंही सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होते. पिडित तरूणी 21 वर्षांची आहे. बोपदेव घाटात ते चक्कर मारण्यासाठी आले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात लोक बोपदेव घाटात आले, त्यांनी दोघांना धमकावलं. मुलाला त्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुलाला त्याच्या शर्ट आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं. अज्ञात तिघांनी मुलीवर अत्याचार केले.या घटनेची माहिती आपल्याला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील आहे.
प्रकरणात तीन हजार मोबाइल क्रमांकाची तपासणी 200 हून सराईतांची चौकशी
या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळवण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.