Ajit Pawar: शाहु-फुले-आंबेडकरांची विचारसरणी मानणारे अजित पवार यंदा संघाच्या रेशीमबागेतील बौद्धिकाला हजेरी लावणार का?
Ajit Pawar: विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना गुरुवार, 19 डिसेंबरला सकाळी 8 वाजता संघ कार्यालयात निमंत्रित केले आहे.
नागपूर: उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक आयोजित केलं आहे. दरम्यान या बौद्धिकाला महायुतीचा घटकपक्ष असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना गुरुवार, 19 डिसेंबरला सकाळी 8 वाजता संघ कार्यालयात निमंत्रित केले आहे. मात्र यावेळी तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार तेथे जाणार की टाळणार, याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांनी फिरवली पाठ
भाजप आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती असली तरी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार संघाच्या बौद्धिक वर्गाला जाणार का, याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या संघपरिचय वर्गाकडे पाठ फिरवली होती.
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार, नेते रेशीम बागेतील स्मृतिमंदिर स्थळी जाऊन सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतात. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2023 मध्ये नागपुरात झालेल्या अधिवेशनादरम्यान संघाकडून परिचय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देखील अजित पवार यांनी संघ मुख्यालयात जाणं टाळलं होतं.
महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण
उद्या (गुरुवारी) सकाळी स्मृतिमंदिर स्थळी आयोजित संघ परिचय वर्गामध्ये येणाऱ्या महायुतीच्या आमदारांना संघाचे विदर्भ प्रांतसंघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे मार्गदर्शन करणार आहेत. संघातर्फे केल्या जाणाऱ्या विविध सेवाकार्यांबाबत यावेळी माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या सर्व आमदारांना स्मृतिमंदिर येथे उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार उपस्थित राहणार का? याची उत्सुकता आहे.
भाजप, शिवसेनेचे आमदार राहणार उपस्थित
संघाने दिलेल्या निमत्रंणानंतर भाजप आणि शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर अजित पवार आणि त्यांच्या पक्षांचे आमदार संघाच्या बौध्दीक वर्गाला उपस्थित राहणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.