कुणी प्रचार केला, कोणी नाही, याचं उत्तर चार जूनला मिळेल; भावना गवळींच्या प्रश्नावर राजश्री पाटलांचं कोड्यात उत्तर
मतदान संपलं असलं तरी माझं जगणं हे कायम सामाजिक वसा घेऊन राहणार आहे. त्यामुळेच, माझं काम नेहमीप्रमाणे सुरू आहे.
हिंगोली : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारांची रणधुमाळी संपली. आता, सर्वांनाच उत्सुकता आहे ती 4 जूनची. मात्र, महाविकास आघाडी व महायुतीमध्ये यंदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अनेकांच्या नाराजीमुळे पक्षनेतृत्वाला उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना कसरत करावी लागली. त्यातच, शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारही बदलण्यात आला होता. हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून तिकीट देण्यात आलं. शिवसेनेनं यवतमाळमधून विद्यमान खासदार भावना गवळींचं (Bhavana gawali) तिकीट कापलं आणि राजश्री पाटील यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे नाराज असलेल्या भावना गवळींनी त्यांचा प्रचार मनापासून केला की नाही, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बहिणी समजून भावना गवळींनी माझ्यासाठी प्रचार केल्याचं राजश्री पाटील यांनी म्हटलं आहे.
मतदान संपलं असलं तरी माझं जगणं हे कायम सामाजिक वसा घेऊन राहणार आहे. त्यामुळेच, माझं काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. माझ्या मतदारसंघातील निवडणूक संपल्यानंतर पक्षाने दिलेली वेगवेगळ्या मतदारसंघातील जबाबदारी मी पार पाडली. त्यामुळे माझं नेहमीचं जे काम आहे ते सुरू, असे म्हणत शिवसेना महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी निवडणुकीवर भाष्य केलं. मला अचानक वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. निश्चितच हे सोपं नव्हतं, हे मान्य करावंच लागेल. मात्र, अचानक वाशिम मतदारसंघात उमेदवारी दिली असली तरी ते माझ्यासाठी वेगळं नव्हतं. कारण, ते माझं माहेर आहे. यवतमाळ वाशिम मतदार संघ हा माझ्या माहेरचा मतदारसंघ आहे. माझ्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून येथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये माझं काम सुरूच होतं. त्यामुळे एक वेगळी अटॅचमेंट मतदारसंघांमध्ये होतीच, असे पाटील यांनी म्हटले.
मतदान टक्केवारी वाढली, त्याचा फायदाच होईल
मतदानाची टक्केवारी वाढली याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे. लेकीवर माहेरचं प्रेम असतं, याकडे मी अतिशय सकारात्मकतेने बघते. जबाबदारी म्हणून यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम, या सर्व कामांचा परिपाक म्हणून त्या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढल्याचं पाटील यांनी म्हटलं. माझ्यासाठी लोकसभा मतदारसंघात सहाही विधानसभेतील सर्व नेत्यांनी काम केलेलं आहे. महायुतीच्या सर्व पक्षातील सर्वच नेते, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलं आहे. स्वतःचं काम म्हणून त्यांनी सर्वांनी माझं काम केलं, सर्व समाजातील लोकांनी मला भरभरून मतदान केल्याचंही राजश्री पाटील यांनी म्हटले.
लहान बहिण बनून माझा प्रचार केला
हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी नाकारुन मला तिकडे वाशिम-यवतमाळ मतदारसंघात पाठवण्यात आलं. कुणाचीही उमेदवारी गेल्यानंतर नाराज होणे हे अत्यंत साहजिक आहे. माणुसकीच्या भावनेतून आपण ते समजून घेतलं पाहिजे. परंतु, भावना गवळी यांनी एक लहान बहिण म्हणून मला लोकसभा निवडणुकीत मदत केली आहे, असे राजश्री पाटील यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्यांची रॅली झाली, माझ्या एक-दोन सभांमध्येही त्या माझ्यासोबत होत्या.
4 जूनला उत्तर मिळेल
एवढा मोठा मतदारसंघ मी सगळीकडे फिरत होते, मला जी जबाबदारी दिली होती, प्रचाराचा कार्यक्रम आखलेला होता, प्रचार करण्यात मी इतकी व्यस्त होते की, कुणी काय-काय केलं हे बघण्यापेक्षा प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली असेल, या सकारात्मक भावनेने मी काम केलं आहे. आता, कुणी प्रचार केला, कोणी नाही केला, या सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चित 4 जूनला मिळतील, असेही राजश्री पाटील यांनी म्हटले.