(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा सभापतीपदासाठी भाजपला उमेदवार सापडला? आंध्र प्रदेशातून 'हे' नाव पुढे, चंद्राबाबूंना रोखण्यासाठी मोठी खेळी
Lok Sabha Speaker : तेलगु देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलकडून लोकसभा अध्यक्षपद आपल्यालाच मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नवी दिल्ली: लोकसभा सभापतीपद आपल्यालाच मिळावं यासाठी आग्रही असलेल्या तेलगु देसम पार्टीच्या चंद्राबाबूंना आता माघार घ्यावी लागणार असल्याची चिन्हं आहेत. कारण भाजपकडून आंध्र प्रदेश भाजप अध्यक्षा दुग्गुबती पुरंदेश्वरी यांचं नाव पुढे आल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. दुग्गुबती पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्ष बनवल्यास टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यावर कोणताही आक्षेप घेणार नाहीत असं भाजपला वाटतं. लोकसभा निवडणुकीत राज्यात टीडीपी आणि जनसेनासोबत भाजपची युती करण्यात दुग्गुबती पुरंदेश्वरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दुग्गुबती पुरंदेश्वरी या आंध्र प्रदेशच्या भाजप अध्यक्षा असून त्या राजमुंद्री लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत गेल्या आहेत. या आधी दुग्गुबती पुरंदेश्वरी काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा खासदार झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महासचिव आणि महिला विंगच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडू आग्रही
सुरुवातीपासूनच लोकसभा अध्यक्षपद आपल्याला मिळावं असा आग्रह टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. त्याचसोबत नितीश कुमार यांच्या पक्षाचीही ही मागणी आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपद हे भाजपकडेच राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे. अशा वेळी चंद्राबाबूंचा संभाव्य विरोध लक्षात घेता त्या जागेवर दुग्गुबती पुरंदेश्वरी यांची वर्णी लावण्याची खेळी भाजपकडून खेळण्यात येऊ शकते असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या नावाला चंद्राबाबूंचाही विरोध नसेल असंही सांगण्यात येतंय.
कोण आहेत दुग्गुबती पुरंदेश्वरी?
दुग्गुबती पुरंदेश्वरी या माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या कन्या आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या बहिणी आहेत. आंध्र प्रदेश भाजपच्या प्रमुख असण्यासोबतच त्या तीन वेळा खासदारही आहेत. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी विशाखापट्टणममधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसमध्ये सामील होण्यापूर्वी त्या आणि त्यांचे पती दुग्गुबती व्यंकटेश्वर राव सुरुवातीला चंद्राबाबू नायडूंसोबत होते आणि त्यांनी 1996 मध्ये टीडीपीच्या सत्तापालटानंतर एनटी रामाराव यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले.
या घटनेनंतर चंद्राबाबू नायडू यांनी संपूर्ण टीडीपी आपल्या ताब्यात घेतली आणि पुरंदेश्वरी आणि व्यंकटेश्वरांना बाजूला केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पुरंदेश्वरी यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर त्या दोनदा खासदार झाल्या आणि यूपीए सरकारमध्ये मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले. मात्र आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयावर नाराज होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये सुरुवातीला त्या राष्ट्रीय सरचिटणीस बनल्या. त्यानंतर महिला विंगच्या अध्यक्षा आणि आता राज्य भाजपच्या अध्यक्षा बनल्या.
चंद्राबाबू नायडू दुग्गुबती पुरंदेश्वरींच्या नावाला विरोध करणार का?
भाजपने दुग्गुबती पुरंदेश्वरी यांना स्पीकर बनवल्यास चंद्राबाबू नायडू त्यांना विरोध करतील याची शक्यता कमी आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दुग्गुबती या चंद्राबाबूंच्या जवळच्या नातेवाईक आहेत. नायडूंच्या त्या कधीही समर्थक नसल्या तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-टीडीपी युतीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचवेळी एनटी रामाराव यांचे सरकार उलथून टाकताना त्यांनी चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा दिला होता.
ही बातमी वाचा: