Vishwajeet Kadam: काहींना काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही, त्यांनी खडे टाकले, पण निवडणुकीत जनतेने जागा दाखवली: विश्वजीत कदम
Maharashtra Politics: सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही; ज्यांनी ही एकी होत असताना खडे टाकले त्याची जागा लोकसभेत दाखवून दिली. सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार विश्वजित कदम गरजले
सांगली: सांगली लोकसभेत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांचा खासदार म्हणून निवडून आल्याबदल काँग्रेसकडूनच (Congress) आणखी एक सत्कार सोहळा आणि स्नेहमेळावा सांगलीत (Sangli News) रात्री पार पडला. काँग्रेसचे नेते मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून हा सोहळा आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी राज्यमंत्री, आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विश्वजित कदम यांच्या भाषणाने काँग्रेस कार्यकर्ते अधिकच प्रोत्साहित झाले.
सांगलीतील काँग्रेस एकत्र करत सर्वांची आम्ही मूठ बांधली. आमच्यातील हेवेदावे सगळे विसरुन आम्ही एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला. सगळी कटुता बाजूला ठेवत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि काँग्रेस नेत्यांसाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली. पण आमची झालेली ही एकजूट आणि आम्ही बांधलेली मूठ काहीजणांना बघवली नाही. तसेच काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले. त्यांना त्यांची जागा या लोकसभेत दाखवून दिली आहे. पुन्हा ते आपल्यामध्ये खडे टाकण्याचे काम करणार नाहीत. पण आपली नेत्याची आणि कार्यकर्त्यांची एकजूट कायम राहायला हवी, असे विश्वजित कदम यांनी म्हटले. पण विश्वजीत कदम यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आङे.
विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेस चार-पाच जागा लढणार: विश्वजीत कदम
गेल्या 10 वर्षांमध्ये जिल्ह्याची विकासाच्या नावाखाली केवळ फसवणूक झाली. यात बदल म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा खासदार दिल्लीला पाठवणे गरजेचेचे होते आणि आपण तो पाठवला. पूर्वीचे विशाल पाटील आणि आत्ताचे विशाल पाटलामध्ये खूप चांगला फरक आहे. आम्ही विशाल पाटील यांना खासदार करू हा शब्द दिला तो पूर्ण ही केला. आता नवा विशाल पाटील सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी काम करून आपले स्वप्न पूर्ण करून दाखवेल असा विश्वास आहे असेही कदम म्हणाले.
येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 4 ते 5 जागांवर काँग्रेस पक्ष लढणार आणि जिंकणार असा विश्वासही कदम यांनी बोलून दाखवला. जिल्ह्याचे नेतृत्व जर आज सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी दिलंय तर माझे वचन आहे की, ज्यांनी ज्यांनी काँग्रेसद्वारे काम केले त्याना चांगला न्याय देऊ. आता एक माणूस विशाल पाटील यांच्या रूपात लोकसभेत पाठवलाय, उद्या सांगली शहरातून दोन आमदार देखील विधानसभेत पाठवू, असा विश्वास कदम यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला . 22 तारखेला सांगली जिल्ह्याची नियोजन कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. विशाल पाटील यांची ही सांगलीतील पहिली बैठक असेल आणि विरोधकांची शेवटची बैठक असेल, असेही विश्वजीत कदम म्हणाले आहेत.
आणखी वाचा
सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज-गैरसमज पसरले, पण आम्ही आघाडी धर्म पाळला; जयंत पाटलांनी मौन सोडलं