Umesh Patil : हाती तुतारी घ्या, नाहीतर पिपाणी, काही फरक पडणार नाही; धैर्यशील मोहिते पाटलांवर अजित पवार गटाचा निशाणा
Solapur Lok Sabha Election 2024 : तुतारी झेपणार नाही, फुंकताना दम लागेल, असं वक्तव्य करत अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर निशाणा साधला आहे.
सोलापूर : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना तुतारी झेपणार नाही, ती फुंकत असताना नक्कीच दम लागेल. त्यांनी हाती तुतारी घेतली काय आणि पिपाणी घेतली काय, काही फरक पडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar Group) गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. एवढंच नाही तर, सत्तेचा मलिदा घेण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil Entry in Sharad Pawar Group) भाजपचा (BJP) वापर केल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला आहे.
हाती तुतारी घ्या, नाहीतर पिपाणी, काही फरक पडणार नाही
धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या असतना उमेश पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहिते पाटील घराणं हे भूतकाळ झालं आहे. मुळात त्यांचं अस्तित्व माळशिरस तालुक्यात पुरतं मर्यादित राहिलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली काय आणि पिपाणी हाती घेतली काय, याचा महायुतीच्या उमेदवाराला काडीचाही फरक होणार नाही, असं म्हणत उमेश पाटलांची निशाणा साधला आहे.
धैर्यशील मोहिते पाटील हाती तुतारी घेणार?
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं (BJP) रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil) भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यावर अजित पवार गटाने हल्ला चढवला आहे.
सत्तेचा मलिदा घेण्यासाठी भाजपचा वापर
धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंब यांना सत्तेचा मलिदा घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीचा वापर करून घेतला. खासदारकीचं दिवा स्वप्न पडत असल्यामुळे त्यामुळे त्यांनी तो मार्ग स्वीकारला असेल. त्यांना तुतारी झेपणार नाही ती फुंकत असताना नक्कीच दम लागेल.
अजित पवार गटाकडून महायुतीला घरचा आहेर
कोल्हापूरची गादी असेल किंवा साताऱ्याची गादी असेल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये गादी बद्दल आदर आहे. दत्तक पुत्र याला महत्त्व नाही, पण त्या गादीला महत्त्व आहे. संजय मंडलिक यांच्याकडून जे वक्तव्य झालं आहे, त्याचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही. महायुतीतील जबाबदार उमेदवाराने अशा प्रकारचे वक्तव्य अजिबात करू नये आणि जर त्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य झाला असेल तर, त्यांनी स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त करावी. छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या पक्षाकडून उभे आहेत त्याच्याही पेक्षा जास्त निवडणुकीच्या बाबतीत आम्ही त्यांचा नक्कीच पराभव करू मात्र गादीचा पराभव होता कामा नये.