Ulhasnagar News : कल्याण लोकसभा मतदारसंघाचा पुढील उमेदवार कोण? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर देणं टाळलं!
Ulhasnagar News : कल्याण लोकसभेचा पुढचा उमेदवार कोण असेल?केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर देणं टाळलं!निवडणुकीला अजून 15 महिने बाकी असल्याचं वक्तव्यश्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम
Ulhasnagar News : आगामी निवडणुकीत कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघाचा पुढील उमेदवार कोण असेल? याचं उत्तर देणं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं. अनुराग ठाकूर यांच्या उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या प्रश्नाचं थेट उत्तर देणं टाळलं.
श्रीकांत शिंदे यांना ठाण्यात पाठवण्याची भाजपच्या हालचाली?
कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत. 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. मात्र राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता येताच भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघ काबीज करुन श्रीकांत शिंदे यांना ठाण्यात पाठवण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं.
लोकसभा निवडणुकीला अजून 15 महिने बाकी : अनुराग ठाकूर
उल्हासनगरमध्ये मंगळवारी (13 सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत अनुराग ठाकूर यांना याबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. उमेदवार कोण असेल याबाबत पत्रकारांनाच जास्त उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय, असं ते म्हणाले. त्यावर आजवर भाजपच्या कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने कल्याण लोकसभेचा असा दौरा केला नसल्याचं पत्रकारांनी सांगितलं. त्यावर निवडणुकीला अद्याप 15 महिने शिल्लक असून मी पुन्हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येणार आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये युतीच्या उमेदवाराचा विजय झाला, तसा यावेळीही विजय होईल, असं ते म्हणाले. मात्र कोणतंही ठोस वक्तव्य त्यांनी केलं नाही. तसंच श्रीकांत शिंदे हेच पुढचे उमेदवार असतील, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं नाही. त्यामुळे खरोखरच श्रीकांत शिंदे आता ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
अनुराग ठाकूर यांचा तीन दिवसीय कल्याण मतदारसंघाचा दौरा
दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांचा दौरा केला. या तीन दिवसात त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मंतदारसंघात भाजपने लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर या मतदारसंघात शतप्रतिशत भाजपच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचं मतदारसंघाचे प्रभारी आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे.
संंबंधित बातम्या