उद्धव ठाकरेंचं दिल्लीत शक्तीप्रदर्शन,दिग्विजय सिंह, शिवपाल यादव यांच्यासह विविध पक्षाचे खासदार भेटीसाठी दाखल
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस, खासदार विशाल पाटील, कल्याण काळे, दिग्विजय सिंहांसह अनेक नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Uddhav Thackeray at Delhi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या राजधानी दिल्लीच्या (Delhi) दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या भेटीसाठी हजेरी लावली आहे. काँग्रेस (Congress) नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर काँग्रेस खासदार कल्याण काळे, याशिवाय समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादवांचे पुत्र आणि खासदार आदित्य यादवांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच, सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार, शाहू महाराज आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे. तर उद्या (गुरुवारी) संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी बोलताना आमचे आणि ठाकरेंचे जुने संबंध आहेत. ठाकरे आणि माझा जुना स्नेह आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादवांचे पुत्र आणि खासदार आदित्य यादवांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आदित्य यादव म्हणाले की, आम्ही मुंबईत पण समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली होती, आज उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते, म्हणून शिष्टाचार म्हणून मी त्यांची भेट घेतली. अखिलेश यादव दिल्लीत आहेत, कदाचित उद्धव ठाकरे आणि त्यांची भेट होऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये ही विधानसभा पोटनिवडणुका होत आहेत आणि महाराष्ट्रातील होत आहेत त्यामुळे हे दोन्ही पक्षांमध्ये संवाद होईल, असं आदित्य यादव म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी कोण कोण?
- दिग्विजय सिंह
- शिवपाल आणि आदित्य यादव
- कल्याण काळे
- विश्वजीत कदम
- विशाल पाटील
- चंद्रहार पाटील
महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरेंच्या भेटीगाठीसाठी अनेकांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी काही मराठी पत्रकारांशीही ठाकरेंनी संवाद साधला. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेनादेखील मविआत मोठा भाऊ नाही. समसमान जागावाटपावर भर दिला जाणार आहे. जागावाटपावर अद्याप महाविकासआघाडीत चर्चा झालेली नाही. अदानीला टीडीआरला विरोधाच्या मुद्यावर नो कॉम्प्रोमाईज, असंही ठाकरे म्हणाले. सत्तास्थापन करण्यासाठी महाविकासआघाडी एकमुखानं काम करणार आहे, असंही ठाकरेंनी सांगितलं.