Uddhav Thackeray On Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गट अन् मनसेच्या युतीवर बोलू नका, राज ठाकरेंचा आदेश; उद्धव ठाकरे म्हणाले...
Uddhav Thackeray On Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये, असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई: शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) यांच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये, असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचे, असे आदेश राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राज ठाकरेंच्या या आदेशावर विचारण्यात आले. यावर चांगलंय ना...त्याच्यात काय, ते बोलतील ना त्यावर...अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. उद्धव ठाकरे आज विधानभवनात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, ठाकरे बंधूंचा मेळावा 5 जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी तेवढा युतीबाबत स्पष्टपणा बोलण्यातून दाखवला नाही.
कोणत्याही माध्यमांशी संवाद साधायचा नाही- राज ठाकरे
एक स्पष्ट आदेश...पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही, असं राज ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करुन सांगितले.
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे भावनिक आवाहन केले, पण भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिला नाही. त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
























