Uddhav Thackeray On Raj Thackeray Alliance: मनसेसोबत युती केल्यास चालेल का?; उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न, शिवसैनिक म्हणाले...
Uddhav Thackeray On Raj Thackeray Alliance: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीही समोर आली.

Uddhav Thackeray On Raj Thackeray Alliance मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांआधी जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीही समोर आली. याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मनसेच्या युतीबाबत प्रश्न विचारला.
मनसे सोबत युती केली तर चालेल का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. यावर बैठकीत उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मनसेसोबतच्या युतीसाठी ग्रीन सिग्नल दिला. मनसेसोबत युती केल्यास काहीच हरकत नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली तर चांगलेच असेल. तुम्ही वरीष्ठपातळीवर चर्चा सुरु करा, असं पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले.
ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी राज-उद्धव एकत्र येणार? (Will Raj-Uddhav come together to preserve the Thackeray brand?)
7 जून रोजी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. 2014 आणि 2017 या निवडणुकानंतर पुन्हा एकदा 2025 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड टिकवायला मनसेप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील ही चर्चा रंगली आहे. सलग तीन दिवसाच्या चर्चेनंतर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे मराठी माणसाचे गळ घालणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहे.
'सामना'च्या मुखपृष्ठावर राज अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो पाहायला मिळाला. 7 जूनच्या 'सामना'च्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला आहे. मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोसह उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही...बातमीच देतो...महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, शिवसेना-मनसे युतीबाबत थेटच बोलले...सूर जुळणार, उत्सुकता वाढली, असंही म्हटलं आहे.
























