Uddhav Thackeray : मी औरंगजेब फॅन क्लबचा मेंबर असेल तर तुम्ही अहमदशाह अब्दाली, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केलीये.
Uddhav Thackeray on Amit Shah, नागपूर : "मी औरंगजेब फॅन क्लबचा मेंबर असेल तर तुम्ही अहमदशाह अब्दाली आहात. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना संपवायला निघालाय. आम्हाला केवळ जनता संपवू शकते, शाह नाही", असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरादार हल्लाबोल केला. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
आपल्या चंद्रपूरची एक शाळा सुद्धा अदाणीला देऊन टाकली
उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्य शहरातील भूखंडांचं श्रीखंड भाजपवाले खात आहेत. मुंबईमध्ये अदाणीने हाहाकार केलेला आहे. आपल्या चंद्रपूरची एक शाळा सुद्धा अदाणीला देऊन टाकली. बाकीची माणसं मेली आहेत का? वन नेशन वन इलेक्शन नाही, वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर असं यांचं धोरण आहे. कोरोना आल्यावर कोश्यारींसह भाजपवाले मंदिर आणि धार्मिक स्थळ उघडा म्हणत होते. मी नाही म्हणालो, त्यामुळे आपला उत्तरप्रदेश झाला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतानी संकट रोखलं होतं
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह आम्हाला संपवायला येणार आहे. आम्हाला केवळ जनता संपवू शकते, अमित शाह नाही. जनतेने सांगावे की, उद्धव घरी बस. तर मी घरी बसेन. जर मला दिल्लीवरुन हे सांगणार असतील तर जनता त्यांना घरी बसवेल. हा लढा माझा नाही किंवा पवार साहेबांचा नाही. हा लढा आपणा सर्वांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतानी संकट रोखलं होतं. म्हणून आज हे दिल्ली बघू शकतात. आज दिल्ली आम्हाला वटारु पाहात आहे. आज दिल्लीवाल्यांना सांगतोय तुमची भीक नको. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही हक्काचं मागतोय, तुमच्या गद्दारांचं काही नको.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला निसटता विजय नकोय, दणदणीत विजय पाहिजे. सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवतो. मी मुख्यमंत्री असताना एकही बातमी आली नाही की, गुजरातला उद्योग गेला. ही सत्तेची लढाई नाही, लूट थांबवण्याची लढाई आहे. जो महाराष्ट्र प्रेमी असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभारेल. रामटेकमधील सहाच्या सहा जागा जिंकून देण्याचं वचन द्या. हे वचन देऊन सरकार आणणार असू तर घोषणा द्या की छत्रपती शिवाजी महाराज की जय..!
इतर महत्वाच्या बातम्या