Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम लावणार असाल तर असंविधानिक असलेलं उपमुख्यमंत्रिपद रद्द करा : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपद देणार नसाल तर उपमुख्यमंत्रिपद रद्द करा अशी मागणी केली.

नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधून महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिवेशनात विदर्भाला काय दिलं गेलं? महाराष्ट्रावर कोसळलेली नैसर्गिक आपत्ती, विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आणि राज्यातील नगरपालिका- नगरपंचायत निवडणुकीतील गैरप्रकार या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन उपराजधानीत होत आहे. अधिवेशन अर्ध्यावर आलं आहे, उद्या संपणार की रविवारी संपणार ते आज किंवा उद्या ठरेल. नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. अधिवेशन मध्यावर आलं आहे. विदर्भासाठी या अधिवेशनात काय दिले गेलं हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रावर कधी नव्हे ती मोठी आपत्ती अतिवृष्टीच्या निमित्तानं कोसळली. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं खराब झाली. पीक खरडून गेली, शेतजमीन वाहून गेली. मुख्यमंत्र्यांनी भलंमोठं पॅकेज असा गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढं काय झालं, की त्याचं ठिबक सिंचन काय झालं कळायला मार्ग नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
शिवराजसिंह चौहान यांनी राज्य सरकारचं बिंग फोडलं
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, पहिला अर्थसंकल्प येतो, मागण्या, पुरवण्या मागण्या, 75 हजार कोटींच्या मागण्या, राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज आहे ते बघतो आहोत. गेल्या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाई घाईनं शेवटच्या आठवड्यात प्रस्ताव पाठवल्याचं जाहीर करण्यात आलं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
ढकलपंची करणारे मदत करणार का? : उद्धव ठाकरे
राज्याच्या मदतीसाठी पाठवलेला प्रस्ताव पटलावर ठेवावा. मायबाप केंद्र सरकार आमच्यावर दया दाखवणार आहे की नाही? दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार तिथून कशी मदत आणणार आहे, कारण डबल इंजिन सरकार आहे. दोन इंजिनचं सरकार एका इंजिनकडून दुसऱ्या इंजिनकडे, दुसऱ्या इंजिनकडून पहिल्या इंजिनकडे अशी ढकलपंची करणारे का खरोखर मदत पाठवणार आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. पीक विम्यातील ट्रिगर बदलल्यानं मदतीची थट्टा झाली आहे. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करणारे का? अनेक प्रश्न आहेत,सरकारकडून जनतेला उत्तरं मिळणार आहेत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी केला.
गेल्या वर्षी म्हणजेच पहिल्या अधिवेशनात भास्कर जाधव यांचं नाव दिलं आहे. नियम आहे की नाही हे कागदावर कळू शकेल. उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नसलेलं पद सरकार निर्माण करु शकत असेल तर विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरत आहात. विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्रिपद ही असंविधानिक पदं रद्द केली गेली पाहिजेत. भाजपच्याच लोकांनी नंबर एकला महत्त्व असतं. दोन आणि तीन नंबरला महत्त्व नसतं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. अध्यक्षांबाबतची मतं गेल्या टर्ममध्ये व्यक्त केलेली आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मित्र मित्र म्हणत एकमेंकांवर धाडी: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी पुढं म्हटलं की, शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष कुठं आहे, सरकार प्रचारात गुंतलेलं आहे. बॅगा भरुन आनंदाचा शिधा जातोय, अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील, लगोलग दुसऱ्या निवडणुका लागतील. ज्या निवडणुकीचा निकाल लागायचा आहे, तशा निवडणुका राज्यात यापूर्वी झाल्या नाहीत. आपण इतर राज्यांच्या निवडणुकांचं उदाहरण द्यायचो, बुथ कॅप्चरिंग, पैशांचं वाटप यासारख्या घटना आपल्या राज्यात होत आहेत. कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही, मित्र मित्र म्हणताना एकमेकांवर धाडी टाकत आहेत, असं ठाकरेंनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
रोज कोणत्या कोणत्या मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यनिशी बाहेर येत आहेत. त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशांच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिम्म आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे, त्याचं नाव पाघरुण मंत्री ठेवायला पाहिजे. म्हणजे बाकीचे जे मंत्री आहे ते पांघरुण बघून हातपाय पसरतील. मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला. इतर खात्याच्या बरोबरीनं पांघरुण खातं तयार करावं आणि स्वत: चार्ज घ्यावा. मला मुख्यमंत्र्यांची दया येते की कोण होतास तू काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू , स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं.
























