(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad News : काय सांगता! निवडणुकीत अख्खी ग्रामपंचायतच विकली; लिलावातून मिळाले 28 लाख रुपये
Gram Panchayat Auction: विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्यावर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे शासकीय कागदोपत्री दाखवण्यात आले.
Gram Panchayat Auction In Aurangabad: औरंगाबादच्या (Aurangabad) शेलुद ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क ग्रामपंचायतीचा लिलाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे ग्रामपंचायतमधील सदस्यपासून तर थेट सरपंचपदासाठी एकूण 28 लाख 56 हजार रुपयांची बोली लावण्यात आली. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून हा लिलाव ठेवण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तर या लिलावाचा कथित व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्यावर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे शासकीय कागदोपत्री दाखवण्यात आले.
राज्यभरात नुकत्याच सात हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात देखील 216 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मात्र याचवेळी काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान याच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतपैकी शेलुद ग्रामपंचायत देखील होती. मात्र आता याच शेलुद ग्रामपंचायतीच्या लिलावाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. गावातील मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव करण्यात आल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. ज्यात सदस्य पदासाठी 70 हजारांपासून तर 2 लाखापर्यंत बोली लागली होती. तर सरपंच पद साडेचौदा लाखात आणि उपसरपंच पद 4 लाखात विकल्याचा दावा करण्यात आला आहे.
असा झाला लिलाव! (विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार माहिती. एबीपी माझा याची पृष्टी करत नाही)
अ.क्र. | पद | पदाची रक्कम | उमेदवारचे नाव |
1 | सरपंच | 1450000 | शकुंतला योगेश ससेमहाल |
2 | उपसरपंच | 400000 | राजू गणपत मस्के |
3 | एस.सी.महिला | 171000 | दर्शना राजू मस्के |
4 | ओबीसी महिला | 75000 | माधुरी अशोक चोरमारे |
5 | सर्व साधारण पुरुष | 125000 | मधुकर अंकुश चौधरी |
6 | सर्व साधारण महिला | 111000 | आशा भरत चौधरी |
7 | सर्व साधारण महिला | 121000 | शाहीन सुभान शहा |
8 | सर्व साधारण महिला | 151000 | द्वारकाबाई एकनाथ नरवडे |
9 | सर्व साधारण पुरुष | 201000 | ज्ञानेश्वर दत्तू नरवडे |
10 | सर्व साधारण पुरुष | 51000 | किसन बळवंत चौधरी |
नागरिकांकडून लिलावाचा जाहीर कबुली
पैश्यांची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. साडेचौदा लाखात सरपंच पद विकण्यात आले आहे. मात्र सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने लिलावाचा केला इन्कार केला आहे. मात्र दुसरीकडे गावातील नागरिकांकडून लिलावाचा जाहीर कबुली देण्यात आली आहे. शकुंतला योगेश ससेमहल असं साडेचौदा लाख रुपये देऊन सरपंच पदी निवडून आलेल्या महिलेचं नाव आहे. तर राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचानेच हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: