Sunil Tatkare vs Bharat Gogavale: महाडच्या सुशांत जाबरेंना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्षपद; तटकरेंचा मास्टरस्ट्रोक, गोगावले गटात खळबळ
Sunil Tatkare vs Bharat Gogavale: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत सुशांत जाबरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

Sunil Tatkare vs Bharat Gogavale: महाड तालुक्यातील प्रभावशाली युवा चेहरा आणि कुणबी समाजातील उदयोन्मुख नेता सुशांत गणेश जाबरे (Sushant Jabre) यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही आठवड्यांतच मिळालेली ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) धोरणात्मक हालचालीचा भाग मानली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत जाबरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ही घोषणा केवळ सन्मानाची नसून, महाडमधील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी “गेम चेंजर” ठरू शकतो.
कोण आहेत सुशांत जाबरे? (Who Is Sushant Jabre)
सुशांत जाबरे हे महाड तालुक्यातील कुणबी समाजाचे प्रभावशाली प्रतिनिधी मानले जातात. तरुण, ऊर्जावान आणि सामाजिक उपक्रमांमधून सक्रिय असलेल्या जाबरे यांनी गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यांचा संघटनात्मक दृष्टिकोन आणि जनसंपर्कामुळे ते स्थानिक राजकारणात एक बलाढ्य युवा चेहरा म्हणून उदयास आले आहेत. या नियुक्तीमुळे भरत गोगावले गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण जाबरे हे गोगावले यांचे “विश्वासू” म्हणून ओळखले जात होते. मात्र, गोगावले यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना योग्य स्थान न दिल्याची नाराजी गोगावले शिबिरात आधीपासून होती. आता जाबरे यांच्या झपाट्याने झालेल्या उन्नतीकडे “गोगावले यांनी दुर्लक्षित केलेल्या माणसाचा विजय” म्हणून पाहिले जात आहे.
महाडच्या राजकारणात आता नव्या शक्तिसमीकरणांची चाहूल- (Mahad Politics)
दुसरीकडे, सुनिल तटकरे यांनी हा प्रवेश आणि नियुक्ती कौशल्याने साध्य करत राष्ट्रवादी काँग्रेससाठी महाडमध्ये मोठं बळकटीचं इंजेक्शन दिलं आहे. तटकरे यांनी स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभं करण्यासाठी केलेली ही हालचाल राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरते आहे. महाडच्या राजकारणात आता नव्या शक्तिसमीकरणांची चाहूल लागली आहे. जाबरे यांच्या राज्यस्तरीय जबाबदारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ संघटनात्मकच नव्हे, तर कुणबी समाज आणि युवा मतदारांमध्येही नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.























