Supriya Sule : "कोणालाही तिकीट द्या पण नावं लवकर जाहीर करा", सुप्रिया सुळेंचं मविआला आवाहान; विधानसभेचं रणशिंग फुंकलं!
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाघाडीच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीला तयार राहण्याचे आवाहन केले.
मुंबई : महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Scheme) बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना भाऊ-बहिणीचं नातं समजलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसाय याच्यात गल्लत केली, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
उमेदवारांची लवकरात लवकर घोषणा करा
आपल्या भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्याला महाराष्ट्रातलं वातावरण बदलायचं आहे. फक्त वातावरणच नव्हे तर सरकार बदलण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी पुढच्या दिशेबद्दल आपल्याला मार्गदर्शन केले आहे. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी महाविकास आघाडीला आवाहन करते की कोणाला तिकीट द्यायचे आहे ते द्या पण त्याची घोषणा लवकर करा. कारण सर्वांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. या यात्रांना उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांना लाडकी बहीण आठवली
आम्ही खासदार जास्तीत जास्त प्रचार करून. जयंत पाटील यांना अर्थकारण सर्वांत जास्त कळतं. आगामी काळात ते आणखी योजना जाहीर करतील. पण गमतीचा भाग म्हणजे लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना कोणालाच त्यांची बहीण आठवली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या आहेत, अशी बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
प्रेमात पैसे आले तर...
एका गोष्टीचं दुर्दैव म्हणजे आमच्या भावांना बहिणीचं नातं कळलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसायात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात. व्यवसायात प्रेम नसतो. कारण व्यवसायात एखाद्यावर प्रेम करायचं म्हटलं तर तोट्याचा व्यवहार होईल. प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणता येत नाही. म्हणूनच महाराष्ट्र सरकारला व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी विरोधाकांवर केली.
या राज्यातलं नातं विकाऊ नाही
ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तरी हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू. पण 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण-भावाच्या नात्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलं, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
दिलेले पैसे परत घेण्याची आमच्यात ताकद
या राज्यात दोन भाऊ असं म्हणाले की कोणती बहीण कोणाला मतदान करते याकडे आमचं लक्ष आहे. एक नव्हे तर दोन-दोन नेत्यांनी असं भाष्य केलंय. जे सत्य आहे, ते तोंडावर येतंच. आमचं तुमच्यावर लक्ष आहे. पण ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर जसे 10 हजार रुपये दिले, तसेच ते परत घ्यायची ताकद आमच्यात आहे, असे यातील एक नेता म्हणाला. त्यांचं बहीण-भावांत प्रेमाचं नातं नाही. हे नातं फक्त प्रेमाशी जोडलेलं नातं आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
हेही वाचा :
शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल : उद्धव ठाकरे