Shivsena UBT: ...तर मातोश्रीवर मर्सिडीजची रांग असती, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता होऊन जाऊ दे!
Shivsena UBT: नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरती शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत यावेळी त्यांना थेट आव्हान देत त्यांनी आत्तापर्यंत पक्षाला काय दिलं ते जाहीर करावं असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या या मोठ्या दाव्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत आम्ही पक्षाला आत्तापर्यंत एक रूपयाही दिला नाही, याउलट पक्षाने अनेकदा कामासाठी निधी दिल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलं आहे, तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये मातोश्रीवरती सर्व गोष्टीवर नीलम गोऱ्हे लक्ष द्यायच्या त्यांनी किती कमावलं याचा हिशोब त्यांनी द्यावा असं वक्तव्य करत संताप व्यक्त केला आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपावरती बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, दोन मर्सिडीज? अरे बापरे मला असं वाटतंय की नीलम गोऱ्हे या आमच्या पक्षात खूप काळ राहिलेले आहेत. मला आत्ता काय दोन अडीच वर्षे झाली आहेत. जवळपास 30 वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काढली आहेत आणि जर त्या म्हणत आहेत. त्यात जर तथ्य असेल तर मला प्रश्न पडला आहे, की नीलम गोऱ्हे यांनी किती कमावलं असेल. कारण आमच्याकडे इतर कुठल्याही माणसांना नीलम गोऱ्हे मातोश्रीवर फिरकू द्यायच्या नाहीत. तीस वर्ष त्याच मातोश्रीवर असल्यासारख्या असायच्या. त्यामुळे सर्व नेमणुकांचे अधिकार हे नीलम गोऱ्हे यांची सही किंवा नीलम गोरे यांनी सांगितल्यावरच ते सामनामध्ये जायचं. तर निश्चितपणे ही सगळी कामाई नीलम गोऱ्हे यांच्याकडे जात असेल त्यांना याबाबत विचारलं पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
खरंतर गोऱ्हे यांना याबाबतचा हिशोब विचारलं पाहिजे. तीस वर्ष गोऱ्हे पक्षात होत्या. मातोश्रीवर त्या कायम पडीक असायच्या. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत आणि मातोश्रीवर कधी कोणी जावं, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचं, कोणाला पद द्यायचं नाही, प्रवेश सुद्धा, सगळं त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल. खरंतर, त्यांचा वार्षिक कमाईचा एवरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होतं त्यांना असेही पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
पक्षाच्या वतीने नीलम गोऱ्हे यांना जाब विचारणार का? या प्रश्नावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, छे ओ, कोण नीलम गोऱ्हे? पद असलं म्हणजे लय भारी झाली होय ती. कसला हा आरोप, मी म्हणते की उलट त्या आरोपाचं तथ्य असेल तर नीलम गोऱ्हेने ते पैसे कुठे ठेवले, तीस वर्षा नीलम गोऱ्हे या पक्षात राहिल्या. त्या पक्षांमध्ये जर हे सगळं होतं असं असेल तर मग नीलम गोऱ्हेंनी एवढा पैसा ठेवलाच कुठे? हा खरा माझा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. इतक्या सगळ्या पैशांचं तुम्ही काय केलं. दुसरा कोणताही माणूस मातोश्रीवर वावरत नव्हता. आमचे म्हात्रे दादा सुद्धा आत्ता आले आहेत. पक्ष फुटीनंतर, त्या सगळ्या काळात फक्त आणि फक्त पक्षात नीलम गोऱ्हेच होत्या. त्यामुळे किती मार्गाने आणि कसा कसा पैसा जमा केला असेल आणि नीलम गोऱ्हे यांनी त्या पैशाचं काय केलं आणि त्या पैशांचं स्त्रोत काय होता, त्याची विल्हेवाट कशी लावली. त्यांनी परदेशात किती पैसे गुंतवले. कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली. नेमकं काय-काय केलं हे सगळं नीलम गोऱ्हे यांना विचारलं पाहिजे. तुम्ही जे म्हणत आहात याचा काही जाब वगैरे विचारायचा का तर साहेब, जाब बरोबरीच्या माणसाला द्यावा लागतो. ज्या बौद्धिक आणि कर्तुत्ववाने बरोबरीचे असतात. चापलूसी करून किंवा बदमाशी करून, मर्जी मिळवून जर पद मिळवणारी लोकं असतील ना तर अशाच चापलूस लोकांवर अजिबात आपण वेळ वाया घालवायचा नाही. आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे चार वेळा आमदार असल्या काय आणि नीलम गोरे विधानसभेवर असल्या काय आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे एक क्रमांकाच्या चापलूस, बदमाश आणि गद्दार आहेत असंही पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, ते तर नमक हरामी आहेत. चार टर्म ज्यांना फक्त फॉर्म भरावा लागला आणि पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यांनी असा आरोप करणे दुर्दैवी आहे. ज्यांना पक्षाने फक्त चार वेळा फॉर्म भरायला जाऊन विधान परिषदेवर उमेदवारी दिली, मी हे रिपीट मुद्दाम बोलतो आहे, कारण असा आरोप करणं ही नमक हरामी आहे, स्पष्ट सांगायचं तर, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
मी उदाहरण देतो, मी ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. संभाजीनगर सारख्या मराठवाड्यातील काम करणारा आज मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामांसाठी निधी दिला आहे. परंतु, माझ्याकडून कधी पक्षाने एक रुपया कधी मागितला नाही किंवा कधी मला द्यावा लागला नाही, आता नीलम ताई बोलत आहेत. त्या ज्येष्ठ आहेत. त्यांनी अशा प्रकारे आरोप करणं दुर्दैवी आहे. मातोश्री वरून मुख्यमंत्रीपदापासून खालच्या अनेक सभापती पदापर्यंत अनेक पद दिली, तर मग मातोश्रीवर मर्सिडीजची रांग लागली असती, उभा करायला जागा राहिली नसती, असंही पुढे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
आरोप करणं आता फॅशन झालेली आहे. अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान नीलम ताई करत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेचा आणि महाराष्ट्रातील नागरिकांचा गोऱ्हे अपमान करत आहेत. ठाण्याच्या बळावर शिवसैनिक कमवत होते असं आहे का? असाही सवाल पुढे दानवे यांनी केला आहे.नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं आहे, मी काहीतरी करते आहे, दुसऱ्यांना नाव ठेवायची आणि स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवायची, अशी परिस्थिती नीलम गोऱ्हे करत आहेत. याउलट नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी- कधी काय-काय दिलं, हेच त्यांनी जाहीर करावं. चला होऊन जाऊ दे. त्या चार वेळा विधान परिषदेच्या आमदार राहिले आहेत, त्या दोनदा उपसभापती राहिल्या आहेत, त्यांनी सांगावं काय काय दिलं, असं थेट आव्हान अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांना दिलं आहे.
साहित्य संमेलनामध्ये अशा विषयांचा संबंध काय आहे? राजकारण करायला साहित्य संमेलनामध्ये जाता का? साहित्य संमेलन राजकीय कारणासाठी वापरले जातात का? असा सवाल ही अंबादास दानवे नीलम गोऱ्हे यांच्यापुढे उपस्थित केला आहे
नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?
कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
