ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.
रत्नागिरी : राज्यातील विधानसभा निवडणुकांतील निकालानंतर महाविकास आघाडीत (MVA) काहीही मरगळ आल्याचं दिसून येत आहे. त्यातच, शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणातही ठाकरेंची साथ सोडून स्थानिक नेतेमंडळी दुसऱ्या पक्षाची वाट धरत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याबद्दल तक्रारींचा पाढा वाचून माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर आपण निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता, कोकणात शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena UBT) गटाला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या रत्नागिरीया तालुकाप्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. प्रदीप साळवी यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे राजीनामा दिला आहे. प्रदीप साळवी यांची विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून कोकणात ओळख असून तळागाळात देखील त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळेच, साळवी यांचा राजीनामा हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. राजीनाम्यानंतर साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणातील राजकारणात आहे.
कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांचेच नेतृत्व आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडे मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासारखे बडे नेते आहेत. त्यामुळे, सध्या शिंदेंच्या शिवसेनेचा आलेख कोकणात वाढत असून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच, राजन साळवी हेही ठाकरेंची साथ सोडून पर्याय निवडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, कोकणच्या बालेकिल्ल्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गट कशारितीने सामोरे जाणार हे पाहावे लागेल.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असून मुंबईसह राज्यातील निवडणुकांमध्ये स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे, आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.