तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; पक्ष सोडणार का, नाराज दूर झाली का? स्पष्टच शब्दात सांगितलं
माझी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली, माझ्या ज्या काही तक्रारी होत्या त्या मी पक्षप्रमुखांकडे मांडल्या आहेत.

मुंबई : फेसबुक लाईव्हमध्ये शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर शिवसेना पक्षाकडून घोसाळकर यांच्या पत्नीला शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, उत्तर मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात होत आहे. तेजस्वी घोसाळकर (Tejasvi ghosalkar) यांनी आपल्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. मुंबई (Mumbai) महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा फटका मानला जात आहे. त्यातच, आज तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तसेच, सध्या मी काही सांगणार नाही. पण मी गद्दारकी केलेली नाही, अद्याप कुठल्याही पक्षात जाण्याचा मी विचार केला नसल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
माझी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली, माझ्या ज्या काही तक्रारी होत्या त्या मी पक्षप्रमुखांकडे मांडल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी काही उत्तर दिली, काही उत्तरं अजून येणे बाकी आहेत. त्यामुळे, सध्या मी काही सांगणार नाही, नाराजी दूर झाली का यावर तुम्हाला लवकरच समजेल, असे तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केले. कालच्या स्तरावर काही गोष्टी क्लियर होणं गरजेचं होतं. पण, त्या झाल्या नसल्याने मला इथं मातोश्रीवर यावं लागलं. ज्या काही गोष्टी होत्या, त्या उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्या आहेत. मी अजून कुठल्याही पक्षांमध्ये जाण्याचा विचार केलेला नाही. मी गद्दारकी केलेली नाही, मी या सगळ्यांवर विचार करेल आणि सांगेल, असे तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी
दरम्यान, महापालिका निवडणुकांपूर्वीच उत्तर मुंबईतील स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेकवेळा नाराजी व्यक्त करून सुद्धा पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे राजीनामा दिल्याचे समजते. त्यातच, तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मातोश्री वरून तेजस्वी यांना बोलवण्यात आला होतं, त्यानुसार त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ठाकरे गटाच्या सर्व पदांचा तेजस्विनी घोसाळकरांनी राजीनामा दिला आहे.
























