Vijay Shivtare : ...तर 10 ते 20 खासदार पडले असते, शिवतारेंनी सांगितलं बारामतीतून माघार घेण्यामागचं नेमकं कारण
विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता अजित पवार यांच्या उमेदवाराला निवडणूक लढवणे सोपे होणार आहे.
पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivesna) नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते मी बारामतीची निवडणूक (Baramati Election) लढवणार आहे, असे ते सांगत होते. काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती . मात्र आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली. मी निवडणुकीला उभा राहिलो तर 10 ते 20 जागांवर आपले उमेदवार पडू शकतात, असे मला सांगण्यात आले. म्हणूनच मी माघार घेतली, असे स्पष्टीकरण यावेळी शिवतारे यांनी दिले.
...तर 10 ते 20 खासदार पडले असते
विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्ष चर्चा झाली. तरीही मी माझा निर्णय बदलला नव्हता. पण मला एक फोन आला. हा फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा होता. मी ऐकत नव्हतो म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री रागावलेही होते. मात्र खतगावकरांचा मला एक फोन आला. मुख्यमंत्र्यांना तुमच्यामुळे अडचण होत आहे. महायुतीला तुमच्यामुळे अडचण होत आहे, असं त्यांनी मला सांगितलं. सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तर कदाचित 10 ते 20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे, असं त्यांनी मला सांगितलं, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.
मी त्यांचं सर्वकही ऐकून घेतलं
पुढे 28 तारखेला रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत आमची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मी सर्वकाही ऐकून घेतलं. मी माझी बाजूदेखील मांडली. मला जो शारीरिक त्रास झाला, माझ्या लोकांचं नुकसान झालं हे मी या बैठकीत मांडलं.
लोकांच्याच हितासाठी राजकारण करतो
त्यांचं सर्वांच ऐकूण घेतल्यानंतर मी माझ्या प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. स्वार्थाच्या पलिकडे जाऊन माझं आयुष्य माझ्या मतदारसंघाला, राज्याला समर्पित आहे. आमच्या या तहातून काही चांगल्या गोष्टी झाल्यावर मला आनंदच होईल. शेवटी आम्ही राजकारण हे लोकांच्याच हितासाठी करतो. मी मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या त्यांच्यापुढे ठेवल्या, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.
दरम्यान, शिवतारे यांचे बंड शमल्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर झाला आहे. त्यांना बारामतीतून निवडणूक लढवणे तुलनेने सोपे होणार आहे.