(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shinde-Fadnavis Government : '50 खोके एकदम ओके' घोषणा शिंदे सरकारची डोकेदुखी?
Shinde-Fadnavis Government : गेल्या चार महिन्यात या 50 खोके एकदम ओकेवरुन राज्यात राजकारण आणि वाद रंगला आहे. ही घोषणा शिंदे सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे.
Shinde-Fadnavis Government : राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर वाद काही केल्या थांबायला तयार नाहीत. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून '50 खोके एकदम ओके' (50 Khoke Ekdam Ok) हा नारा देण्यात आला. आता हीच '50 खोके एकदम ओके' घोषणा शिंदे सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे. कारण गेल्या चार महिन्यात या आरोपामुळे शिंदे सरकारवर (Shinde Government) नामुष्कीची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची जीभ घसरली. त्याचं कारणही हे '50 खोके एकदम ओके' ही घोषणाच ठरली. गेल्या चार महिन्यात या पन्नास खोक्यावरुन राज्यात राजकारण आणि वाद रंगला आहे.
बच्चू कडूंनाही खोक्यांच्या घोषणेमुळे डोकेदुखी
बरं 50 खोक्यांच्या आरोपामुळे अब्दुल सत्तार एकटेच चिडलेत असं नाहीत. यापूर्वी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही खोक्यामुळे डोकेदुखी सहन करावी लागली. लग्नात गेलो तरीही खोकेवाले आमदार आले असं म्हणतात, अशी खंत बच्चू कडूंनी माझा कट्ट्यावर बोलून दाखवली. विशेष म्हणजे भाजपचे सहकारी अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला आणि या वादाला सुरुवात झाली होती.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर 50 खोक्यांवरुन गदारोळ
बच्चू कडू, रवी राणा यांच्या पुरताच 50 खोक्याचा वाद रंगला असं नाही. तर गेल्या अधिवेशनात थेट विधिमंडळाच्या पायऱ्यावरही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दुमदुमल्या होत्या. राज्याच्या इतिहासात कधी झाला नसेल एवढा गदारोळ 50 खोक्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यावर बघायला मिळाला. शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे आमदार यावरुनच एकमेकांना भिडले देखील होते.
राज्यभर '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा
गेल्या काही दिवसात 50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पोहोचली. कोणी बैलांना रंगवताना 50 खोके एकदम ओके घोषणा लिहिली तर कोणी रांगोळीत. काहींनी तर गद्दार थाळीही काढली होती. उद्धव ठाकरे यांनी तर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिंदे गटातील आमदारांचा खोकासूर म्हणत उल्लेख केला होता. एवढंच नाही तर शिवाजी पार्कवर यंदा 50 खोक्याचा रावणही जाळण्यात आला.
एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादासाठी आम्ही बाहेर पडलो. ही तत्त्वांची लढाई आहे असं शिंदे यांनी सांगितलं. पण महाविकास आघाडीतील नेत्यांनी याला तत्वांची नाही तर खोक्यांची लढाई करुन टाकली.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन चार महिने झाले आहेत. पण 50 खोक्यांचा आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची पाठ काही केल्या सोडायला तयार नाही. खरंतर राज्यात ओला दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, रस्त्यावरील खड्डे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु हे प्रश्न मांडण्यात ना विरोधकांना रस दिसतोय ना प्रश्न सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना.