Satara : साताऱ्याची लढत ठरली! भाजपच्या उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदे फायनल, थोड्याच वेळात उमेदवारी जाहीर होणार
Satara Lok Sabha Election : सातारा हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा बालेकिल्ली असला तरी त्या ठिकाणचा उमेदवार मात्र अंतिम होत नव्हता.
Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावावर अखेर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी निवडणूक लढण्यास प्रकृती कारणास्तव नकार दिल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे रिंगणात उतरणार आहेत. महायुतीचा उमेदवार अद्याप जरी अंतिम नसला तरी उदयनराजे हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे.
शरद पवारांचा बालेकिल्ला, मात्र उमेदवार ठरत नव्हता
सातारा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार सातत्याने निवडून येतोय. गेल्या लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनी चारच महिन्यात राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत साताऱ्यातील मतदारांनी उदयनराजेंच्या भूमिकेला मान्यता न देता राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांना पसंती दिली.
यंदाच्या निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास नकार दिला आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांचे नाव पुढे केले. त्याचसोबत कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पाटणचे सत्यजितसिंह पाटणकरांचं नावही चर्चेत आलं.
कुणी उमेदवार नसल्यास मी लढायला तयार
सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती. सुरूवातीला लोकसभेसाठी नाही म्हणणाऱ्या शशिकांत शिंदे यांनी नंतर मात्र आपली भूमिका बदलली. साताऱ्यातून जर कुणी लढायला तयार नसेल तर मी लढायला तयार आहे असं त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वक्तव्य केलं.
शरद पवारांचे अत्यंत विश्वासू
शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे विश्वासू आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी पवारांना साथ दिली. आधीच्या जावळी मतदारसंघातून ते निवडून यायचे. नंतर जावळी हा परिसर साताऱा शहराशी जोडला गेला आणि त्या ठिकाणी त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते शिवेंद्रराजेंनी निवडणूक लढवली. नंतर शशिकांत शिंदे यांना बाजूच्या कोरेगाव मतदारसंघातून ल़ढावं लागलं. त्या ठिकाणाहून शशिकांत शिंदे आमदारही झाले.
गेल्या निवडणुकीच्या वेळी कोरेगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. सातारा लोकसभेच्या निवडणुकीची धुरा अंगावर असलेल्या शशिकांत शिंदे यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात लक्ष न देता आल्याने त्यांना त्यावेळी निसटता पराभव झाला होता.
ही बातमी वाचा: