(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: छगन भुजबळांच्या घरवापसीची जोरदार चर्चा, परतीच्या संकेताबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले....
Maharashtra Politics: छगन भुजबळ अजित पवार गटात प्रचंड नाराज असल्याची चर्चा. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत संधी नाकारल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे भुजबळ घरवापसी करतील, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बारामती: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्यामुळे भुजबळ यांचे बिनसले आहे. कालपर्यंत ते ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आमच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे छगन भुजबळ आता शरद पवार गटातच (Sharad Pawar camp) माघारी येतील, अशी कुजबूज सुरु झाली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भुजबळांच्या घरवापसीविषयी भाष्य केले. ते गुरुवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी शरद पवार यांना भुजबळांविषयी विचारणा करण्यात आली. तुमचे जुने सहकारी छगन भुजबळ यांना आता पश्चाताप होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्याकडून परतीचे संकेत मिळत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात, 'आम्हाला काही माहिती नाही', असे उत्तर दिले. छगन भुजबळ यांनी अलीकडेच, 'मी राष्ट्रवादीसोबत आहे, अजितदादांसोबत नाही', असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय असू शकतो, असे पवारांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले की, ते असं का बोलले सांगता येत नाही, त्यामागे काय पार्श्वभूमी होते, ते असं का बोलले, हे सांगता येणार नाही. माझी आणि त्यांची वर्ष-सहा महिन्यात भेट झालेली नाही. आमचा संपर्कही झालेला नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आमच्या सुप्रियालाही पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं: शरद पवार
देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आहेत. तर सुप्रिया सुळे (Supriya Sule) 1 लाख 54 हजारांनी निवडून आल्या. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली.
छगन भुजबळ यांचं म्हणणं काय?
छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याविषयी 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात त्यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, तसंच कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
आणखी वाचा
छगन भुजबळ यांची इच्छा मारली जाते याची किंमत कदाचित मोजावी लागेल; अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया