(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madha : माढ्यात शरद पवार 'मास्टरस्ट्रोक'च्या तयारीत! रणजित निंबाळकरांच्या विरोधात थेट विजयसिंह मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात?
Madha Lok Sabha Election : रणजित निंबाळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांना उतरवणार असल्याच्या चर्चा असून त्यासाठी अजित पवार गटातील नाराजांचीही मदत मिळण्याची शक्यता आहे.
सोलापूर: राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Election) आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपने या आधीच रणजित निंबाळकरांची (Ranjit Nimbalkar) उमेदवारी जाहीर केली असून त्याच्या विरोधात आता शरद पवार गटाकडून मोठी खेळी खेळण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. रणजित निंबाळकरांच्या विरोधात माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटलांना (Vijaysingh Mohite Patil) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यावर खलबतं सुरू आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नाराजांचीही साथ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला
माढ्यामध्ये रणजित निंबाळकर यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केल्याची माहिती आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांना भेटायला सिल्वर ओकला गेले होते.
रविवारी अकलूज येथे राष्ट्रवादीच्या नाराजांची जी बैठक पार पडली त्या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित होते. याच बैठकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट कापलं नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय झाला आहे.
अजित पवार गट नाराज
अकलूज येथे सध्याचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर, रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार दीपक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील, शेकाप चे डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशा दिग्गज नेत्यांची अकलूज येथे बैठक पार पडल्यानंतर आज रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
भाजपने जाहीर केलेलं रणजीत नाईक निंबाळकर यांचा तिकीट न कापल्यास संपूर्ण गट विरोधी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर आपली पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता आहे.
माढ्याचा वाद आणि भाजपची डोकेदुखी
माढा लोकसभा उमेदवारीमधून सुरु झालेला वाद आता भाजपाची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे. रणजित निंबाळकरांचं तिकीट जर कापलं नाही तर मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फायदा शरद पवार गट उठवण्याच्या तयारीत आहे . निर्णय कायम ठेवला तर मोहिते पाटील नाराज होणार आणि जर तिकीट बदलून दिले तर राज्यात, देशात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या वादाला असेच स्वरूप प्राप्त होईल अशा कात्रीत भाजप सापडला आहे.
मोहिते समर्थकांसमोर गिरीश महाजन हतबल
मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी आलेले भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील मोहिते समर्थकांच्या संतापासमोर हतबल झाले होते. मोहिते पाटील हे भाजपासाठी खूप महत्त्वाचे असून त्यांची नाराजी दूर करणे माझ्या आवाक्याबाहेर असल्याने आता पक्षाचे जेष्ठ नेते त्यांच्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढतील अशी भूमिका महाजन याना घ्यावी लागली आहे.
उमेदवार बदलण्यासाठी दबाव
रविवारी दिवसभर अकलूजमध्ये महाभारत घडत असताना विद्यमान खासदार हे मतदारसंघातील इतर आमदार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. आता मोहिते पाटील याना शांत करण्यासाठी भाजप तिकीट बदलणार का नाराज झालेले मोहिते पाटील हाती तुतारी घेऊन भाजपाला दणका देणार याचे चित्र येत्या चार दिवसात पाहायला मिळणार आहे. पण प्रेशर गेमपुढे आता माढ्यात भाजपने एक पाऊल मागे घेतल्यास इतर सर्वच ठिकाणी असणाऱ्या नाराजी दूर करताना पक्षाने दिलेल्या उमेदवारी बदलण्याचा दबाव वाढत जाणार आहे .
आता मोहिते पाटील यांच्या प्लस आणि मायनस चे गणित भाजपाला घालावे लागणार असून जर मोहिते मायनस केले तर त्यांना माढा जिंकताना खूप शिकस्त करावी लागेल. तशात माढा येथील निंबाळकर यांची उमेदवारी बदलून मोहिते पाटील याना दिल्यास सहापैकी पाच आमदारांची नाराजीचा विचारही भाजपाला करावा लागेल.
ही बातमी वाचा: