Sharad Pawar : अजितची कष्ट करण्याची तयारी, मोठं मन दाखवून पवारांनी सांगितली अजितदादांची वैशिष्टे, पण 'हे' खटकतं
Sharad Pawar On Ajit Pawar : सत्तेत असताना लोकांची कामं करायची, सत्तेत नसताना आधी जे काही निर्णय घेतले होते त्याची खालपर्यंत अंमलबजावी करायची अशी आपल्या कामाची पद्धत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
मुंबई: या आधी मला सोडून गेलेल्या आमदारांचा मी पराभव केला, आता लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट 80 टक्के असल्याने विचार करा किती आमदार पडणार असा अप्रत्यक्ष इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला. काही लोक दबावाने किंवा आणखी कशाने सोडून गेले असतील तर त्याचा वेगळा विचार करावा लागतो, पण सरसकट लोकांना परत घेणार नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. तसेच अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) कष्ट करण्याची तयारी आहे, हाती घेतलेल्या कामांवर बारकाईने लक्ष असतं असं शरद पवारांनी सांगितलं. लेट्सअप मराठी या यूट्यूब चॅलेलला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी अजित पवारांचे गुण आणि खटकणारी गोष्ट सांगितली.
अजितचे कामावर बारकाईने लक्ष
अजित पवारांचे गुणवैशिष्ट काय असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, अजितची कष्ट करण्याची तयारी आहे. सकाळी लवकर उठून कामाला लागण्याचा त्याचा स्वभाव आहे. हाती घेतलेल्या कामावर त्याचे बारकाईने लक्ष असतं.
अजितच्या टोकाची भूमिका घेण्याचा स्वभाव मान्य नाही
अजित पवारांना काय सल्ला देऊ इच्छिता असं विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, समाजकारणामध्ये काम करताना, भूमिका मांडत असताना, काही पथ्य पाळावी लागतात. राजकारणात काम करत असताना रोज अनेक लोक भेटतात. पण समोरच्याचं मान्य नसेल तरी लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही, अजित पवार ती भूमिका घेतात. त्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी मी अनेकदा प्रयत्न केला,पण त्यांचा स्वभाव बदलला नाही.
राजकारणात सातत्यता नाही
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांनी निवडणुकीआधी जो काही निर्णय घेतला, लोकांसमोर मतं मांडताना जी काही भूमिका मांडली होती ती नंतर बदलली. राजकारणामध्ये सातत्यता पाहिजे. नेत्यांना समजलं पाहिजे की आपण कशासाठी मतं मागतो, कोणत्या विचारासाठी मतं मागतो.
पवारांचा इरा संपला म्हणणारे मुख्यमंत्र्याचे मंत्री झाले
देवेंद्र फडणवीसांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, राजकीय इरा संपला असं म्हणाले होते. त्यांनी तसं म्हटल्यानंतर सरकार बदललं, आम्ही राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणल. त्यानंतर कुणाचा इरा संपला ते त्यांना कळलं असेल. नंतर ते सत्तेत आले पण मुख्यमंत्र्याचे मंत्री झाले. लोक बोलून जातात, दुर्लक्ष करावं.
सुनेत्रा पवारांवर काय म्हणाले शरद पवार?
राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, मी त्यांना आतापर्यंत एकदाही सभागृहात पाहिलं नाही, मीही जास्त नसतो. पण एखादा महत्त्वाचा विषय असेल तर मी वेळेच्या आधी उपस्थित असतो, कदाचित त्यावेळी त्या नसतील. त्यांना वेळ लागेल,पण संधी मिळाली तर चांगलं काम करून आपलं संसदीय काम सुधारावं.
घड्याळावर दावा करणार की तुतारी कायम ठेवणार?
चिन्हाच्या संबंधी प्रश्न उपस्थित करणार नाही. पण तुतारी आणि पिपाणी यावर काहीतरी तोडगा काढावा लागणार. कारण त्याचा फटका आम्हाला नाशिक आणि साताऱ्यामध्ये बसला. घड्याळ्याचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे, सोडून गेलेल्या सहकाऱ्यांनी न्यायालयाच्या सूचना पाळल्या पाहिजेत असं शरद पवार म्हणाले.
संकटं आली पण पुन्हा संख्याबळ मिळवलं
संकटं येतात पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेलेल्या सर्वांचा पराभव मी केला आहे आणि पुन्हा तेवढी संख्या केली असं शरद पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 1980 साली आपले 58 आमदार निवडून आले होते, त्यावेळी आपण विरोधी पक्षनेता होतो. आपण 10 दिवस बाहेर गेलो होतो, परत आल्यानंतर आपल्यासोबत फक्त 5 आमदार राहिले. पण आपल्याला सोडून गेलेल्या सर्व आमदारांना पाडलं आणि पुन्हा जुनं संख्याबळ परत मिळवलं.
सत्तेत असताना लोकांची कामं करायची, सत्तेत नसताना आधी जे काही निर्णय घेतले होते त्याची खालपर्यंत अंमलबजावी करायची अशी आपल्या कामाची पद्धत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
विधानसभेच्या जागावाटपाचं काय?
राज्यातील विधानसभा जागावाटपावर बोलताना शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीच्या जागा वाढल्या, पण सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नव्हतं. आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची सारखी ताकद आहे. पण राज्यात इतरही काही लहान घटक आहेत, त्यांनाही काही जागा द्याव्या लागतील.
ही बातमी वाचा: