Sharad Pawar : ... अर्धवट वारी करणारे हौशे-नवशे-गवशे, शरद पवारांचा अजित पवारांना टोला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, मीही हौशे-नवशेतील एक
Supriya Sule On Wari : पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे : वारी ही आळंदी ते पंढरी अशी करतात असं सांगत अधेमध्ये जे वारी करतात ते हौशे-नवशे-गवशे असतात असा टोला शरद पवारांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला होता. त्यासाठी पवारांनी वारी करणाऱ्या रशियातील एका महिलेचा संदर्भ दिला होता. त्यावर तिथेच उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपणही त्या हौशे-नवशेतील असल्याचं सांगितलं.
काय म्हणाले होते शरद पवार?
एक जुनी आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की,मी रशियात गेलो असताना तिथली महिला माझ्यासोबत मराठीत बोलत होती. त्यावेळी मला सांगितले की त्या वारी करतात. त्या वारीला पुण्यात आल्या तेव्हा मी घरी बोलावले. त्यावेळी पुण्यातील एका महिलेने त्यांना विचारले तुम्ही वारी कुठून करता? तर ती रशियन महिला म्हणाली वारी ही आळंदी ते पंढरपूर करायची असते. अधेमध्ये जे वारी करतात त्यांना हौशे नवशे गवसे म्हणतात.
अजित पवारांनी बारामती ते काठेवाढी असा वारीमध्ये सहभाग नोंदवला. त्यावर अजित पवारांनी त्यांना टोला लगावला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीदेखील हौशे-नवशे-गवशे या प्रकारातील असल्याची कबुली दिली.
पालखीचा विषय आमच्या आस्थेचा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संविधान आणि आपले संत यांचे विचार एकच आहेच. एका वर्षांपूर्वी असं वाटायचं आपला देश अंधश्रद्धाकडे निघाला आहे का? पण अयोध्येत पण भाजपचा पराभव झाला. मी श्रीराम म्हणत नाही तर मर्यादा पुरूषोत्तम राम म्हणते. चुकीच्या राईट विंगला हा लोकांनी राजकारणात रिजेक्ट केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली संविधान समता दिंडीला भेट देण्यासाठी उपस्थिती लावली. शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, संत तुकाराम महाराजांचे वंशज बापू महाराज मोरे व्यासपीठावर उपस्थित होते. ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या समता भूमी फुलेवाडा पुण्यातून मागील सहा वर्षापासून निघणाऱ्या संविधान समता दिंडीला त्यांनी भेट दिली आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संविधान समता दिंडी येत असते, त्या दिंडीला शरद पवार यांनी भेट दिली.
शरद पवार म्हणाले की, कन्हेरी येथे मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड विना घेऊन मार्गदर्शन करतात. सोनोपंत दांडेकर हे संत विचार पोहोचवत होते. गेल्या 800 वर्षांपासून माणुसकीच्या माध्यमातून दिला जातो. जातीभेद इथे नसतो. संतांचा विचार महाराष्ट्रापुरता सीमित नाही. पंजाबमध्ये बादल ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मी मंत्री होतो. ते माझ्याकडे आले आणि नामदेव महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी पंजाबला यावं लागेलं अशी विनंती केली. एक शीख व्यक्ती हे करतो . त्यांचा धर्म वेगळा असला तरी त्यांनी संतांचा विचार घेतला.
वारकरी संप्रदाय पुरोगामी विचारांचा
संत तुकाराम महाराजांचे वंशज बापू महाराज मोरे देहूकर म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा पुरोगामी विचारांचा आहे. वारकरी संप्रदायाबद्दल चुकीचा प्रचार केला गेला. संतांना भजन कीर्तनापुरतंच मर्यादित ठेवले गेले. अंधश्रद्धेवर पहिला प्रहार तुकाराम महाराजांनी केला. जेवढं दाभोलकर बोलू शकत नव्हते, तेवढं पडखड तुकाराम महाराज बोलले आहेत. लोकांच्या अंगात येत ते खोटं आहे की खरं आहे तुम्ही ठरवा. संत कायम सत्याच्या बाजूने राहिले आहेत. चांगल्या संस्काराचा दुष्काळ पडला तर मानवता मरते.
वारी चालताना सत्याग्रहाची आठवण
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यावेळी म्हणाले की, वारीमधील अनुभव हा दुर्लभ होता. भक्तीच्या शक्त मधून लोक वारी मध्ये चालतात. श्रद्धेच्या मार्गावरून चाललं की एक शिस्त येते, सगळ्यांना घेऊन पुढे चालता येतं. पण जिथे अंधश्रद्धा असते तिथे लालसा येते. आज चालताना बापूंची (गांधीजी)आठवण आली. कारण सत्याग्रहाच्या दरम्यान ते अनेक ठिकाणी चालत होते. आता 'भक्त' या शब्दातसुद्धा फरक आहे. संविधानाला वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती अजूनही संपलेली नाही. एक शक्ती अजूनही आपल्याला वेगळं करण्याचं काम करतेय. राज्यातील निवडणुका येतील त्यात आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. राष्ट्राचा खरा आत्मा आज रस्त्यावर पाहायला मिळाला.
ही बातमी वाचा: