घसा बसला, शब्द फुटंना, तरीही लेकीसाठी बापाची सभा; शरद पवारांच्या भाषणानंतर बारामतीकरांची घोषणाबाजी
लोकसभा निवडणुकांसाठीची यंदाची ही बारामतीमधील शेवटची सभा आहे, आपण दरवर्षी शेवटची सभा याच प्रांगणात घेत असतो. पण, ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांनी यंदा ती जागा आपल्या ताब्यात घेतली
बारामती : राज्याची हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok sabha) मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्यादिवशी वातावरण चांगलंच तापलं होतं. एकीकडे अजित पवारांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. तर, दुसरीकडे सुप्रिया सुळेंसाठी माय-बाप मैदानात उतरल्याचं दिसून आलं. सुप्रिया सुळेंसाठी (Supriya Sule) शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रतिभा पवार दोघेही प्रचारसभेला उपस्थित होते. सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. तर,रोहित पवारांनीही अजित पवारांना थेट लक्ष्य केल्याचं दिसून आलं. यावेळी, रोहित पवार शरद पवारांची आठवण सांगताना भावुक झाल्याचंही दिसून आलं. येथील सभेत शरद पवारांनी सर्वात शेवटी भाषण केलं. मात्र, घसा बसला असताना त्यांच्या तोंडातून शब्दही स्पष्टपणे फुटत नसल्याचं यावेळी दिसून आलं.
लोकसभा निवडणुकांसाठीची यंदाची ही बारामतीमधील शेवटची सभा आहे, आपण दरवर्षी शेवटची सभा याच प्रांगणात घेत असतो. पण, ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांनी यंदा ती जागा आपल्या ताब्यात घेतली. पण, कुणी जागा अडवली म्हणून आपलं काही नुकसान होऊ शकत नाही. बारामतीमधील सभेला आज अमेरिकतही महत्त्व आहे. हा देश कसा चालवायचा आणि कुणी चालवायचा, सध्याचे सत्ताधारी कसारितीने हा देश चालवत आहेत हेही येथील यापूर्वीच्या भाषणात सांगितलं गेलं. या भाषणात एकच भूमिका महत्त्वाची आहे. मोदींच्या हाती सत्ता असो किंवा इतर कुणाच्या हाती सत्ता असो. पण, जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत, तोपर्यंत बारमतीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही, असे शरद पवारांनी म्हटलं. म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे.
महागाई, बेकारी, शेतीचा प्रश्न आहे. सत्ताधारी या कुठल्याही प्रश्नावर बोलताना दिसत नाही. त्यामुळे, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा निवडून येतील, यासाठी मतदान करा. गेले काही दिवस मी जाहीर सभा घेत फिरतोय, या निवडणुकीत तुमचा निर्णय हा बारामतीकरांसाठीच नाही, तर महाराष्ट्रासाठी हिताचा होईल, असे म्हणत शरद पवारांनी बारामतीमधील सभा काही वेळातच आटोपली. मात्र, घसा बसला असतानाही, तोंडातून शब्द फुटत नसतानाही शरद पवार लेकीसाठी सभेत बोलत होते. त्यामुळेच, शरद पवारांनी आपले भाषण आटोपते घेताच, उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी दिली. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार शरद पवार... अशी घोषणाबाजी बारामतीकरांनी केली.
हेही वाचा