(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Himachal Pradesh Assembly Election 2022: मतपत्रिकेद्वारे उमेदवारांची निवड, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचा नवीन प्रयोग
Himachal Pradesh Assembly Election 2022: हिमाचल प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. अशातच ता निवडणुकीच्या संदर्भात भाजप नवा प्रयोग करत आहे.
Himachal Pradesh Assembly Election 2022: हिमाचल प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. अशातच ता निवडणुकीच्या संदर्भात भाजप नवा प्रयोग करत आहे. यावेळी उमेदवार निवडण्यासाठी मतपत्रिकेचा वापर करत आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या एका वर्गाचे मतही जाणून घेत आहे.
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप म्हणतात की, आम्ही केडर आणि संघटनेवर आधारित पक्ष आहोत. लोकशाही व्यवस्थेचे पालन करण्यासाठी भाजपची ओळख आहे. या सर्व बाबी पाहता उमेदवार निश्चित करण्यापूर्वी कार्यकर्त्यांचे मतही आम्ही जाणून घेत आहोत. अशा प्रकारे सदस्यांची मतेही ऐकता येतात. पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, यामुळे जमिनीशी जोडलेल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळविण्यातही मदत होईल.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कार्यकर्ते मतपत्रिकेद्वारे पक्षाला कौल देत आहेत. मतपत्रिकेवरील मतदान निष्पक्ष राहण्यासाठी गुप्त ठेवण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक मत तयार करता यावे यासाठी संसदीय मतदारसंघातून हे मत घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हिमाचल प्रदेशातील प्रत्येक निवडणुकीत सत्ता बदलते
हिमाचल प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे. आजपर्यंत राज्यात प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताबदल होतो, असा ट्रेंड आहे. मात्र यंदा भाजपला हा ट्रेंड मोडायचा आहे. भाजपमधील उमेदवारांबाबत खुद्द नेतेही संभ्रमात आहेत. अशा परिस्थिती कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. आता भाजपचा ना नवीन प्रयोग यशस्वी ठरतो के पुढे कळेलच.
दरम्यान, सोमवारी जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी हिमाचल भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या पहिल्या यादीबाबत चर्चा झाली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर आज पहिली यादी जाहीर होऊ शकते, असे बोलले जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत, ज्यावर 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि अंतिम निकाल 8 डिसेंबरला घोषित केला जाईल. तसेच हिमाचलमध्ये भाजपसमोर फक्त काँग्रेसचं आव्हान आहे. हिमाचलमधील 68 जागांसाठी काँग्रेस एकाचवेळी उमेदवारांची यादी जाहीर करू शकते, असे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने 16 ऑक्टोबर रोजीच 57 उमेदवार निश्चित केले होते. मात्र अंतर्गत गटबाजीच्या भीतीने काँग्रेसने ही यादी रोखून धरली आहे. आज काँग्रेसचीही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.