(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Savarkar Gaurav Yatra: भाजप-सेनेची सावरकर गौरव यात्रा 30 मार्चपासून होणार सुरू, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
Savarkar Gaurav Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरात 'सावरकर गौरव यात्रा' ( Savarkar Gaurav Yatra) काढणार असल्याची घोषणा केली
Savarkar Gaurav Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच सोवमारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. ज्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरात 'सावरकर गौरव यात्रा' ( Savarkar Gaurav Yatra) काढणार असल्याची घोषणा केली होती. याबद्दलच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे राज्यभरात 30 मार्च ते 6 एप्रिल याकाळात सावरकर गौरव ( Savarkar Gaurav Yatra) यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.'' चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही बावनकुळे यांनी यावेळी दिले.
बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा प्रवास करेल. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी 6 एप्रिल रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः या यात्रेत सहभागी होणार आहोत.
महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान निमूटपणे सहन केला. सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती. उद्धव ठाकरेंकडे धाडस असेल तर त्यांनी काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून टाकावी असे आव्हान आपण त्यांना दिले होते. मात्र हे आव्हान त्यांनी स्वीकारले नाही, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत. या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं होतं ज्यात ते म्हणाले होते की, ''स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. कितीतरी क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असताना त्यांचा अत्यंत हिरीरीने बचाव करताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसून आले. असे करताना त्यांना वीर सावरकर यांचा अपमान दिसला नाही. हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता.''