पक्ष फुटला पवार काका पुतण्यांचे मार्ग वेगळे झाले, साताऱ्याची जागा भाजपला, लोकसभेला 25 वर्षात पहिल्यांदा 'ही' गोष्ट घडणार?
Satara Lok Sabha Seat : सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यामध्ये लढत होणार आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली.
सातारा : राज्यभर चर्चेत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha Seat) निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाकडून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शशिकांत शिंदे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साताऱ्याची जागा महायुतीत भाजपला मिळाली असून उदयनराजे भोसले(Udaynraje Bhonsle ) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज 18 एप्रिलला दाखल करणार आहेत. भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा काल करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा शरद पवारांसोबत
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर झालेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघानं शरद पवारांची साथ दिली आहे. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी सातारा आणि कराड हे दोन लोकसभा मतदारसंघ होते. कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी काम केलेलं आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर लक्ष्मणराव पाटील, उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांना मतदारांनी निवडून दिलं. साताऱ्याच्या मतदारांनी देशात आणि राज्यात कशीही स्थिती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत देखील श्रीनिवास पाटील विजयी झाले.
राष्ट्रवादी फूट, पवार काका पुतण्यांचे मार्ग वेगळे
अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी 2 जुलै 2023 रोजी बंड केलं आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं. या दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी फुटली त्यानुसार सातारा जिल्ह्यात देखील दोन गट पडले. विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे आमदार मकरंद पाटील आणि दीपक चव्हाण यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्धार केला. तर, दुसरीकडे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीत जागा शरद पवारांकडे
सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आली. इथं शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे अजित पवारांनी पक्षाच्या कर्जत येथील अधिवेशनात रायगड, बारामती, शिरुर आणि सातारा लोकसभेची जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, जागा वाटपात ही जागा भाजपकडे गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा सातारच्या मतदारांसमोर लोकसभा निवडणुकीत मतदान करताना घड्याळाचं चिन्ह उपलब्ध नसेल.
संबंधित बातम्या :
लढाई फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना पत्रातून आवाहन