Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Sanjay Raut on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Sanjay Raut on Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप केला जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. आतापर्यंत बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय
संजय राऊत म्हणाले की, बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तो कायदा असा होतं. बीड जिल्ह्याने अनेक खून पाहिले. महाराष्ट्र संतोष देशमुख खुनामुळे हादरला आहे. बीडच्या आकासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाहीत, पण मागील वर्षात किती जणांना सोडलं आणि किती जणांना अडकवलं? याची SIT चौकशी करायला हवी. किती जणांच्या किंकाळ्या, आक्रोश फडणवीस यांनी दाबला? याचा तपास व्हावा, असे त्यांनी म्हटले.
आता 'बीड क्लिंटन'चे किस्से ऐकतोय
ते पुढे म्हणाले की, राज्याला कलंक लागलेला आहे. आतापर्यंत बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते आता बीड क्लिंटनचे ऐकत आहोत. बीड प्रकरणात अटक झाली, परभणी प्रकरणात अटक होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे सुद्धा या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून आहेत. यावर आम्हाला राजकारण करायचा नाही. या सगळ्या तपसाला गती आणि दिशा मिळायला पाहिजे. आम्ही देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाची भेट घ्यायला जाऊ, असे संजय राऊत यांनी सांगितले.
पराभवामुळे खचून जाणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक नाही
शिवसेना ठाकरे गटात अवस्थता पाहायला मिळत आहे. राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे लोकं अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. शिंदे स्वतः अस्वस्थ आहेत. आमिष आणि सत्तेचा धाक दाखवला जातोय. आम्ही कार्यकर्ते तयार करतो आणि ते घेऊन जातात. पण शिवसेनेची बस रिकामी होतं नाही. राजन साळवी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पराभव झाल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. एका पराभवामुळे खचून जाणारा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक नाही, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा