Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांच्या खंजीर खुपसण्याच्या आरोपांवर संजय राऊतांचं पहिल्यांदाच उत्तर, म्हणाले...
Sanjay Raut Reply To Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी राज्यात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केल्याची माहिती आहे, पण भाजपला अप्रत्यक्ष मदत होईल अशी कुणी भूमिका घेऊ नये असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई: जागावाटपाची जी काही चर्चा होत होती ती महाविकास आघाडी (Maha Viksa Aghadi) म्हणून होत होती, ती प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि माझ्यात होत नव्हती, त्यामुळे मी काही खोटं बोलत नाही असं प्रत्युत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकरांना दिलं. प्रकाश आंबेडकरांना आम्ही शेवटी अकोल्यासह पाच जागांचा प्रस्ताव दिला होता, ते आमच्यासोबत यावेत असंच आमचं मत होतं असंही ते म्हणाले. संजय राऊत खोटं बोलतात, त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल्याचा आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्या आरोपांवर संजय राऊतांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे.
जी काही चर्चा ती महाविकास आघाडीमध्ये
ही महाविकास आघाडीची चर्चा आहे, शरद पवार होते, उद्धव ठाकरे होते, नाना पटोले होते. त्यामध्ये मी कुठेच नव्हतो. प्रकाश आंबेडकरांना अकोल्यासह चार जागांचा प्रस्ताव होता, त्यामध्ये आमची सीटिंग जागा असलेल्या रामटेकचा समावेश होता. काँग्रेसकडूनदेखील चांगला प्रस्ताव होता. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आग्रही होते. शेवटी त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला.
भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये
प्रकाश आंबेडकर राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे लोक देशाचं संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, त्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत होऊ नये असं आम्हाला वाटतंय.
ना प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात ना आम्ही खोटं बोलतोय असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची कोणतीही चर्चा झाली नाही असंही ते म्हणाले.
ज्या जागांवर वाद आहेत त्या जागावर मैत्रिपूर्ण लढत व्हावी अशी काही नेत्यांची मागणी आहे, पण मैत्रिपूर्ण लढत ही भाजपच्या पथ्यावर पडेल असं संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकर हे विद्वान नेते आहेत, ते आमच्यासोबत यावेत असं आम्हाला वाटतंय असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. 3 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची पत्रकारपरिषद होणार आहे. त्यावेळी सर्व मोठे नेते उपस्थित असणार असून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा: