दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
या घटनेने नागपूर शहरासह परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Nagpur Murder: राज्यात गुन्हेगारीनं कळस गाठला असून मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या,परळीत गोळीबार, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असतानाच नागपूर शहरातून घडलेल्या दोन हत्याकांडांनी संपूर्ण शहर हादरले आहे. नागपूर शहरातील हत्यासत्र थांबायचं नाव घेत नसल्याचं समोर येतंय. रविवारी दिवसाढवळ्या आणखी एकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दुपारी दोन वाजाताच्या सुमारास ख्रिश्चन स्मशानाच्या चौकीदारावर चाकूचे वार करत एका तरुणाने ही घटना जरीपटका ख्रिश्चन दफनभूमीत येथे घडली असून रमेश शेंडे असं खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. या घटनेने नागपूर शहरासह परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.(Maharashtra Crime News)
नक्की झाले काय?
रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक युवक हातात चाकू घेऊन जरीपटक्यातील ‘भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कब्रस्थान’ येथे आला. तेथील चौकीदार रमेश शेंडे याच्या दिशेने धावत गेला. त्याचा हात पकडून काहीतरी विचारणा केली. त्यानंतर चाकूने रमेश यांच्यावर वार केले. त्यावेळी तेथे अंत्यविधीसाठी आलेला युवक जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या युवकाला पकडले. तोपर्यंत रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही नागरिकांनी रमेश यांना रुग्णालयात पोहचवले तर आरोपीला किरण यांनी घट्ट पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. हत्याकांडाबाबत माहिती दिली. काही वेळातच जरपीटकचे पोलीस निरीक्षक संजय सिंग तेथे पोहचले. त्यांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळ पंचनामा करुन हत्येचा गुन्हा दाखल केला.
नागपुरच्या गांधीबाग परिसरात एकाची हत्या
नागपूरच्या गांधीबाग परिसरात काली माता मंदिराजवळ मध्यरात्री घडलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पैशाच्या जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमी तरुणांची ओळख अद्याप पूर्णपणे पटलेली नाही. मात्र, त्यांची नावे रवी आणि दीपक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.