Sanjay Raut : मोदींची कृत्रिम हवा संपुष्टात आलीय, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालावर संजय राऊतांची टिप्पणी
Sanjay Raut on Haryana and Jammu Kashmir Result 2024 : जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय.
मुंबई : जम्मू काश्मीर (Jammu-Kashmir Result 2024) आणि हरियाणातील (Haryana Result 2024) विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) आज निकाल आहे. या निवडणुकीचा कल समोर आला असून हरियाणामध्ये भाजप आघाडीवर दिसून येत आहे तर जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे. मात्र या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार? याचे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीच्या निकालावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदींची कृत्रिम हवा आता संपुष्टात आली आहे. भाजप आणि मोदींचा मुखवटा उतरलाय, असे त्यांनी म्हटले. तर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार, असा विश्वासदेखील संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, हरियाणामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत मागे-पुढे चालू असतं. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी पुढे-मागे चालूच राहणार आहे. कालच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, जिंकण्याचा पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. तो काय बंदोबस्त होता हे आम्ही पाहून घेऊ. हरियाणामध्ये भाजप, मोदी आणि शाहांच्या विरोधात लाट आहे. तेथील जनता यंदा कुठल्याही परिस्थितीत भाजपला निवडून आणणार नाही.
हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस जिंकणार
आत्ताच निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. मला विश्वास आहे की, हरियाणामध्ये काँग्रेस सरकार बनवणार आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सरकार बनवेल. काश्मीरच्या जनतेने मोदी, अमित शाह आणि भाजपला राज्यातून बाहेर काढले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
भाजप, मोदींचा मुखवटा उतरलाय
हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणावर काय फरक पडेल? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कुठेही निवडणुका घेतल्या की भाजप हरणारच आहे. मोदींची कृत्रिम हवा आता संपुष्टात आली आहे. भाजप आणि मोदींचा मुखवटा आता उतरला असल्याचा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला. तर हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या असल्या तर महाराष्ट्रातील निकाल हा भाजप विरोधात असला असता. आता महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा 175 ते 180 जागा महाविकास आघाडी जिंकेल. भाजप कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरणार, असा दावादेखील संजय राऊत यांनी केलाय.
संजय राऊतांची मिश्कील टिप्पणी
महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटप जाहीर झालेले नाही. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महायुती तरी अजून जागावाटप कुठे झालेले आहे, आम्ही चर्चा करू. आमची लोकसभेत आघाडी होती, आम्ही निवडणुका जिंकलो. विधानसभेच्या 288 जागा आहेत. आता हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीमुळे काँग्रेसला टॉनिक मिळाले आहे. त्यामुळे आता चर्चेत थोडं टॉनिक दिसेल, अशी मिश्कील टिप्पणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.
निवडणूक आयोग म्हणजे भाजप
भाजपला हरियाणाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आघाडीवर दाखवले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणजे काय भाजपच आहे ना. ते काहीही करू शकतात. पण अजून बरेच निकाल यायचे आहेत. अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत. मात्र हरियाणामध्ये काँग्रेसचेच सरकार येईल, यात काही शंका नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा