(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhajiraje on Manoj Jarange: मनोज जरांगेना उद्या काही काही झालं तर.... अंतरवालीच्या व्यासपीठावरून संभाजीराजेंचा इशारा
मराठा अरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा जीव महत्त्वाचा आहे.
Sambhajiraje chhatrapati on Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या सातव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत प्रचंड खालावली असून त्यांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती अंतरवली सराटी येथे दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत सरकारला एवढी यंत्रणा असून निर्णय घेतला नसल्याचं ते म्हणाले. हे सरकार आंदोलन गुंडाळायलाच बसलंय. मनोज जरांगेंना उद्या काही झालं तर सरकार जबाबदार असेल. मनोज जरांगेंचा जीव महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले.
मनोज जरांगेंचे रिपोर्ट मला दाखवत जा
हे सरकार आंदोलन गुंडाळायलाच बसलंय. मनोज जरांगेंच्या तब्येतीबाबत कोणी ऐकलं नाही तर मला सांगा. मनोज जरांगेंचे रिपोर्ट मला दाखवत जा. जरांगेंच्या बाबतीत कोणतीही बेताची परिस्थिती आली तर ते आपल्याला परवडणारे नाही. ज्या दिवशी पाणी पित नाही. अशी परिस्थिती येईल त्या दिवशी संभाजीराजे छत्रपतीला फोन करा, मी कुठेही असलो तरी दुसऱ्या मिनीटाला मी अंतरवली सराटीत येईन. असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
अंतरवली सराटीत दाखल झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. तुम्ही सत्तेत बसला आहात. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकार कसं आरक्षण देणार आहे यावर भाष्य करायला हवं. हे आरक्षण कसं टिकणार आहे यावर बोला असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला,अठरापगड जातींसह बारा बलूतेदारांना न्याय दिला. त्यामुळं जे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्या सरकारनं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी.
इथं जर काही झालं तर सरकार जबाबदार
मनोज जरांगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. मी त्यांच्याशी व्यक्तीगत बोललोय. मनोज जरांगे पाटलांच्या सोबत मी आधीसुद्धा होतो. आताही आहे. आणि पुढेसुद्ध असणार. असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. माझी सरकारला विनंती आहे. इकडे या. काय परिस्थीती आहे ते बघा. तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. या इकडे बघा काय परिस्थिती आहे. सगळ्या यंत्रणा आहेत तुमच्याकडे. इथं जर काही झालं तर सरकार जबाबदार असणार. विरोधकही तेवढेच जबाबदार असतील. मनोज जरांगे पाटील या समाजासाठी योद्धा म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजीराजे छत्रपतींची आहे.
आजच्या बैठकीत एकदाचा निर्णय घेऊन टाका..
घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं चूकीचं असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. जरांगेंना काही झालं तर सरकार आणि विरोधक जबाबदार असतील असा इशारा आंतरवली सराटीतून संभाजीराजेंनी दिला. आज मंत्रीमंडळाच्या उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीत एकदाचा निर्णय घेऊन टाका असं त्यांनी सरकारला सांगितलंय.