'आता राजकारण वाड्यावरून चालणार नाही तर गावगाड्याच्या हातात, रणजित निंबाळकर माढ्यातून दीड लाख मतांनी जिंकणार'
Madha Lok Sabha Election : ग्रामीण भागातील चालीरीती बघितल्या तर गांजावाल्यापाशी गांजावाला जातो, भजनवाल्यापाशी भजनवाला जातो, लुटारूपाशी लुटारू जातो तसं या इंडिया आघाडीतील नेत्यांचं झालं आहे असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.
!['आता राजकारण वाड्यावरून चालणार नाही तर गावगाड्याच्या हातात, रणजित निंबाळकर माढ्यातून दीड लाख मतांनी जिंकणार' sadabhau khot slams dhairyasheel mohite patil claim ranjit nimbalkar will won madha lok sabha election with 1 5 lakhs margin marathi 'आता राजकारण वाड्यावरून चालणार नाही तर गावगाड्याच्या हातात, रणजित निंबाळकर माढ्यातून दीड लाख मतांनी जिंकणार'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/02/f1a477a9fb017aff787f85cc37a1503e171208231985493_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर: माझ्यासारख्या फाटक्या माणसाला माढ्यातून (Madha Lok Sabha Election) पाच लाख मतं मिळत असतील तर राजकारण आता वाड्यावरून चालणार नाही तर गावगाड्याच्या हातात असल्याचं स्पष्ट झालंय असं रयत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केलंय. रणजित निंबाळकर हे माढ्यातून दीड लाख मतांनी जिंकणार असा दावाही त्यांनी केला. देशाची निवडणूक हि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी असून देशातील बहुजन समाज , अलुतेदार , बलुतेदार यांना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे, त्यामुळेच त्यांना मोठा पाठिंबा आहे असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची टेंभूर्णी येथे बैठक घेत रणजित निंबाळकर यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. माढा लोकसभेची उमेदवारी रणजित निंबाळकर यांनाच मिळणार असे मी आधीही सांगितले होते, आता ते किमान दीड लाख मतांनी जिंकतील असे जाहीर करतो असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.सदाभाऊ खोत यांनी 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांना अतिशय निसटत्या मताने पराभव पत्करावा लागला होता.
एकदा शिरलो तर शिवार मोकळं केल्याशिवाय बाहेर येत नाही
सदाभाऊ खोत म्हणाले की, कोण कुठे जाणार हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मात्र आम्ही एकदा पातीच्या शिवारात शिरलो की शेजारचा आहे का खुरपे टाकून गेला हे न पाहता संपूर्ण शिवार मोकळं केल्याशिवाय सोडत नाही. माझ्या सारख्या फाटक्या माणसाला माढा लोकसभेत पाच लाख मते मिळाली, यावरून आता राजकारण वाड्यावरून नाही तर गावगाड्यावर चालते हे स्पष्ट झालंय.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, ग्रामीण भागातील चालीरीती बघितल्या तर गांजावाल्यापाशी गांजावाला जातो, भजनवाल्यापाशी भजनवाला जातो, लुटारूपाशी लुटारू जातो, खिसेकापूपाशी खिसेकापू जातो, तसे इंडियावाले आहेत. त्यामुळे ते एकत्र आल्याने काय होणार?
एकाबाजूला नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला गांजावाले, पाकीटमार वगैरे एकत्र झाले आहेत. इंडिया हा शब्द इंग्रजांनी आणला आणि इंग्रज येथे लुटायला आले होते. मात्र भारत हा आपला पारंपरिक शब्द आहे आणि इंडिया ही लुटारूंची टोळी आहे असा टोला सदाभाऊ खोतांनी लगावला.
सदाभाऊ खोत म्हणाले की, दुःख फक्त एवढेच की उद्धव ठाकरे भारताच्या पंक्तीतून उठून इंडियाच्या पंक्तीत गेले. सत्ता आली की राजकारणी धृतराष्ट्र होतात. शरद पवार यांना त्यांच्या पोरीला वर आणायचे आहे, तर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पोराला वर आणायचे आहे. मात्र नरेंद्र मोदी यांना ना पोरगा, ना नातू , ना पुतण्या. त्यामुळे त्यांना फक्त देशातल्या जनतेला वर आणायचे आहे. पूर्वी असणारी राजकारणातील प्रस्थापितांची मांदियाळी नरेंद्र मोदी यांनी केव्हाच संपवली आहे . त्यामुळे राज्यात 45 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार असून माढा लोकसभेतून रणजित निंबाळकर जिंकणार.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)