...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, रोहित पवारांनी सांगितलं राज'कारण'; अजित दादांना ऑफर
राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत.

भंडारा : सामान्य जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा बेरोजगारांचे प्रश्न घेऊन आपण भंडाऱ्यात (Bhandara) शेतकरी मोर्चा तथा मंडल यात्रा काढत आहे. मतांची चोरी पकडी गई, राहुल गांधींनी उघड उघड पुराव्यानिशी मतांची चोरी झाल्याचं प्रेस कॉन्फरन्समधून जाहीर केलं आहे. आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत, टप्प्याटप्प्याने समोर येणार आहोत. मतांची चोरी म्हणजेच लोकशाहीची चोरी आहे. लोकशाहीची चोरी होत असेल तर, गरिबांना न्याय देता येणार नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. तसेच, अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे वक्तव्य आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी केलं आहे. मतांची चोरी झाली आहे, आमच्याकडेही पुरावे आहेत, येत्या काळात आम्ही ते समोर आणू, असेही रोहित पवारांनी म्हटले.
राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. सध्या ते आमदार सत्तेत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आणखी काही नेते त्यांची साथ सोडत आहेत. त्यातच, रोहित पवार यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही भाजपाच्या विरोधात अहो, भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे, जर अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि शरद पवार साहेबांसोबत पुरोगामी विचारासोबत ते आले तर आम्ही त्यांचा विचार करू. मात्र, अजित पवार भाजपसोबत असतील तर आम्ही एकत्र येऊच शकत नाही. जर त्यांनी भाजपला सोडलं तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं तो विचार केला जाईल, असे म्हणत अजित पवारांनी भाजपची साथ सोडल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात रोहित पवारांनी भाष्य केलं.
माझ्यावरसुद्ध ईडीची कारवाई झाली
निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना अनेक प्रलोभन दिले. कर्जमाफी असो, बोनस असो, त्यात अजूनही त्यांनी शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. माझ्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली. मात्र, मराठी माणूस हा लढायला तयार होतो आणि मी सुद्धा लढत आहे. काही कारवाईच्या धास्तीनं सत्ता जिथे आहे, तिथे जातात. मात्र, आमच्यासोबत जे आहेत ते संपूर्ण निष्ठावान आहेत. त्यामुळे येत्या काळात यश नक्कीच येणार, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला. आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि ते शरद पवारांकडे आले तर नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, असा मतांची चोरी नक्कीच झालेली आहे आमच्याकडेही पुरावे आहे आम्हीही ते येत्या काळात समोर आणणार असल्याचे रोहित पवार यांनी एबीपी माझा शी बोलताना स्पष्ट केलं.
हेही वाचा
शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न; राज ठाकरेंनाही घातलं साकडं, नेमकं काय म्हणाले?























