Rohit Pawar on Jayant Patil : जयंत पाटील भावनिक झाले, पण त्यांनी अजून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही; रोहित पवारांच्या वक्तव्याची चर्चा
Rohit Pawar on Jayant Patil : जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

Rohit Pawar on Jayant Patil : अखेर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही मागणी जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले की, 'मी प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीवर विचार करेन.' दुसरीकडे, जर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले, तर त्या जागी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव या पदासाठी इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. आता यावर खुद्द रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, जयंत पाटील हे वर्धापनदिनी घरचा कार्यक्रम असल्यासारखे भावनिक झाले. मात्र, त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मला मिळावी, अशी माझी कोणतीही इच्छा नाही. अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणारे, पक्षातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींना ती जबाबदारी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्या नेतृत्वाखाली काम करू.
मी पदासाठी लढणारा माणूस नाही
आम्हाला विचार तोच पण शैली वेगळी, असा आक्रमक प्रदेशाध्यक्ष हवा आहे. मला जबाबदारी दिली तर मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार नाही. मी पदासाठी लढणारा माणूस नाही. माझ्या मनात काय आहे हे पवार साहेबांना माहीत आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, ही विनंती मी शरद पवार साहेबांना करेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
...तर राज ठाकरे यांचे नाव खराब होईल
दरम्यान, एकीकडे मनसे-शिवसेना युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात भेट झाली. दोन्ही नेत्यांनी तब्बल एक तास चर्चा देखील केली. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी सामान्य लोकांमध्ये वातावरण निर्मिती झाली असताना राज ठाकरे जर देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर मनसेने वाटाघाटी करण्यासाठी ती वातावरण निर्मिती केली होती का? असा सवाल उपस्थित करत यामुळे राज ठाकरे यांचे नाव खराब होईल, असे त्यांनी म्हटले. जेवढी कटुता ठाकरे कुटुंबात आहे ती पवार कुटुंबात नाही. पवार परिवार व्यापक विचाराचे असल्याने कुटुंबिक स्तरावर आम्ही एकत्र आहोत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा

























