Chhagan Bhujbal: अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
Chhagan Bhujbal on antarwali sarati: जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे हे नाव प्रकाशझोतात आले होते. तेव्हा मराठा आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते.
नाशिक: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार केला. यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार (Rohit Pawar) आणि स्थानिक आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) हे अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी आले आणि त्यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना पुन्हा त्याठिकाणी बसवले, असा दावा अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला. ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माझ्या माहितीप्रमाणे अंतरवालीत ज्यावेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीमार झाला तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. परंतु, रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले. यानंतर तिकडे शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे हेदेखील तिकडे गेले. पवार आणि उद्धव साहेबांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती. आंदोलकांच्या दगडफेकीत 80 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी अंतरवाली सराटीत स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला, हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहिती नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले.
मात्र, रोहित पवार आणि राजेश टोपे हे दोन्ही नेते अंतरवाली सराटीत आल्याने काय घडलं तर प्रसारमाध्यमांसमोर या प्रकरणातील एकच बाजू समोर आली. याचा फायदा पुढे मनोज जरांगे पाटील यांना झाला. मात्र, अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा वाटा आहे, असे तेथील लोक सांगत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. भुजबळांच्या या आरोपांवर आता रोहित पवार आणि राजेश टोपे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल: छगन भुजबळ
मागच्या लोकसभेचा निकाल पाहून हा निकाल असाच येईल असे नाही. मी अनेक वेळा असे पाहिले आहे. लोकसभेचा निकाल वेगळा असतो विधानसभेचा वेगळा असतो, तर महापालिकेचा निकाल आणखीन वेगळा असतो. केंद्राचे प्रश्न लोकसभेच्यावेळी वेगळे होते. त्यामध्ये फेक निरेटिव्ह सेट झाले , संविधान बदलणार त्याचा परिणाम झाला. एनडीएच्या जागा पण कमी झाल्या. त्याचा प्रश्न इथे नाही. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना असेल , शेतकऱ्यांच्या योजना असतील, विद्यार्थ्यांना स्टायपेंड असेल, मुलींना डिग्री , शिक्षण मोफत तीन सिलेंडर फुकट या सगळ्या योजनांचा परिणाम असा दिसतो,निश्चितपणे महायुती आघाडी पुढे जात आहे. राज्यात महायुती आघाडीचे सरकार परत येईल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा