रश्मी ठाकरे- अमृता फडणवीस यांचा एकत्र प्रवास, दोन्ही कुटुंबातील टोकाची कटुता मिटणार?
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघींनी एकत्र प्रवास केला. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी -राधिक मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्रीवेडिंग सोहळ्याला दोघींनी हजेरी लावली होती.
मुंबई : एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वादाने टोक गाठलं असताना, ठाकरे-फडणवीस कुटुंबातील जवळीक साधणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघींनी एकत्र प्रवास केला. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी -राधिक मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्रीवेडिंग सोहळ्याला दोघींनी हजेरी लावली होती. गुजरातच्या जामनगरमध्ये हा सोहळा होता. या सोहळ्याला जाताना मुंबई ते जामनगर (Mumbai to Jamnagar) असा प्रवास दोघींनी एकत्र केल्याचं सांगण्यात येत आहे.
अंबानींच्या घरी हा खास सोहळा होता. या सोहळ्याला जाताना रश्मी वहिनी- अमृता वहिनींनी एकत्र प्रवास केला. गेल्या पाच वर्षात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यातही ठाकरे-फडणवीस कुटुंबियांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र या सगळ्यात आता एक अत्यंत इंटरेस्टिंग घटना घडली आहे. अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबियांनी एकाच विमानानं प्रवास केला.
खासगी विमानाने प्रवास
अनंत अंबानींच्या प्रिवेडिंग सेलिब्रेशनकरता जामनगरला जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या परिवारानं एकाच खाजगी विमानानं मुंबई ते जामनगर असा प्रवास केल्याची माहिती आहे. मुंबई ते जामनगर विमान प्रवासानं दोन्ही कुटुंब आपापसातील कटुता दूर करून जवळ आले आहेत का अशी चर्चा रंगू लागली आहे.
प्रवासादरम्यान संवाद काय?
दोन दिग्गज कुटुंबियांने एकत्र प्रवास केल्याने त्यांच्या विमान प्रवासादरम्यान संवाद झाल्याची माहिती आहे. 29 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबिय एकाच वेळेस जामनगरसाठी निघाले होते. यावेळी अमृता फडणवीस यांच्याकडे जास्त सामान होते. अमृता फडणवीस यांच्यासाठी जे विमान होतं, त्यामध्ये हे सर्व सामान मावणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागणार होता.हे दुसरं विमान ठाकरे कुटुंबियांचं होतं. यानंतर अमृता फडणवीस यांनी एव्हिएशनला विनंती केली की, दुसऱ्या विमानाने प्रवास करण्याची विनंती केली होती. एव्हिएशनने ठाकरे कुटुंबाची परवानगी घेतली, ठाकरे कुटुंबाने कोणताही नकार दिला नाही. यावेळी ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते.
ठाकरे-फडणवीस कुटुंबात दरी
महाविकास आघाडी झाल्यापासून ते महायुती होईपर्यंत दोन्ही कुटुंबियांमध्ये अंतर वाढले आहे. 2019 नंतर ठाकरे-फडणवीस कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावरून ठाकरे कुटुंबियांवर बऱ्याचं वेळा टीका केली होती. त्यानंतर ठाकरेंनीही उघड उघड भाषणात अमृता फडणवीसांचे नाव न घेता टीका केली होती.
या सर्व राडेबाजीनंतर आता ठाकरे-फडणवीस या दोन्ही कुटुंबांतील होम मिनिस्टर्सनी एकत्र प्रवास केल्याने, दोन्ही कुटुंबातील कटुता दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO : रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस यांचा एकत्र प्रवास
संबंधित बातम्या
रश्मी ठाकरेंना चौकशीला बोलवणार का? फडणवीस म्हणाले, मैदानात उतरतो तेव्हा कागदपत्र घेऊनच उतरतो!