मनोज जरांगे यांची बाजू घेतो का म्हणून बार्शीत एका तरुणाला मारहाण? राजेंद्र राऊतांनी आरोप फेटाळले
एवढी दादागिरी गुंडगिरी कशी चालणार लोकशाहीत असं म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगेंना खडे बोल सुनावलेत
Solapur: बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Rajendra Raut vs Manoj Jarange) यांच्या सध्या चांगलाच वाद होताना दिसतोय. मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतो का म्हणून बार्शीत एका तरुणाला आमदार राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय. मात्र, जरांगे पाटील यांनी आपल्यावर खोटे आरोप केले असल्याचं आमदार राजेंद्र राऊत म्हणताहेत. मागील काही दिवसांपासून आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. अशातच आमदार राजेंद्र राऊतांवर मारहाणीचे गंभीर आरोप होताना दिसतायत.
दरम्यान, राजेंद्र राऊतांच्या कडव्या टीकेवर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी सोलापूरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय. मनोज जरांगेंनी केलेले आरोप खोटे असून काल केजमधील घोंगडी सभेतही त्यांनी हाच आरोप केला होता. मारहाण झालेल्या तरुणाने अजून तक्रारही दाखल केली नसल्याचं राऊत म्हणाले.
जरांगे दादांच्या डोळ्यावर काळी पट्टी
आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगेंनी केलेले आरोप फेटाळत जरांगेंना चांगलच खडसावल्याचं दिसून आलं. ते म्हणाले, जरांगे दादांच्या डोळ्यावर काळी पट्टी आलीय. बार्शीत सभा झाली तेंव्हापासून जरांगेंनी मला टार्गेट केलंय. ते बोलतात आम्ही सुपारी घेतली, बीड जाळायचा आहे का? आम्हाला गोळ्या घालणार आहात का? असा सवाल करत एवढी दादागिरी गुंडगिरी कशी चालणार लोकशाहीत असं म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगेंना खडे बोल सुनावलेत. यावर मराठा समाजाने निषेध म्हणून राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय.
राऊतांची वक्तव्य सुरु राहिल्यास गनिमी काव्यानं उत्तर देणार
सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत मराठा समाजाने निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील मराठा समाजाने एकत्रित येत जोडे मारो आंदोलन केले. यावेळी - आमदार राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिल्यास गनिमी काव्याने उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जर जरांगे खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत
जर जरांगे हे खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत मविआच्या फायद्यासाठी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण करणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असे करून दाखवू, या मराठा छाव्याला तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.