Raj Thackeray - Amit Shah Meet : दिल्लीत मोठ्या घडामोडी! मनसे-भाजप युती होणार, राज ठाकरेंची अमित शाहांसोबत खलबतं
Raj Thackeray - Amit Shah Meet : राज्यात उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूतीची कमी करण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याची चाल भाजपकडून खेळण्यात येत आहे.
नवी दिल्ली: राज्याच्या महायुतीमध्ये आता मनसेचा (BJP MNS Alliance) समावेश होणार हे निश्चित झालं असून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा (Mahayuti Seat Sharing News) झाल्याची माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात असं सांगितलं जातंय. तसेच मनसेचा महायुतीमध्ये समावेश झाल्याची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. त्यानंतर मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणाहून मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
विनोद तावडेंची राज ठाकरेंशी चर्चा
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची दिल्लीत भेट घेतली आणि चर्चा केली. त्यानंतर दोघेही अमित शाह यांच्या निवासस्थानी निघाले.
ठाकरेंची सहानुभूती कमी करण्यासाठी भाजपची चाल
शिवसेना फुटून दोन गट पडले तरी मुंबईत आणि राज्यभरात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती कमी झाल्याचं दिसत नाही. भाजपच्या आतापर्यंतच्या अहवालात तेच नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी ठाकरे ब्रँडच उपयोगी येईल असा कयास भाजपचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने मनसेसोबत चर्चा केली असून त्यांनाही लोकसभेच्या काही जागा देण्यात येणार आहेत.
राज ठाकरेंच्या समावेशाने महायुतीला नक्कीच फायदा होईल असं बोललं जातंय. राज ठाकरे यांचा करिश्मा लोकसभेच्या निवडणुकीत उपयोगी पडेल असा भाजपचा अंदाज आहे.
बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता?
राज ठाकरे यांच्याकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील यासाठी संमती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा सध्या भाजपकडे आहे, तर शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा:
Raj Thackeray Delhi : मनसे-भाजपची युती होणार? दिल्लीत मोठी खलबतं, अमित ठाकरेही उपस्थित