Raj Thackeray: लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे युतीच्या हालचाली; राज ठाकरे कसे गेमचेंजर ठरणार, दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण?
Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे युती होणार? मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळाल्यास उमेदवार कोण? बाळा नांदगावकर रिंगणात उतरणार? राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याने दोन्ही पक्षांमधील युतीबाबत काहीतरी ठोस घडण्याची शक्यता
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. त्यांच्या काहीवेळानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) हे दिल्लीला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन भाजप (BJP) नेत्यांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आज रात्री दिल्लीत भाजप आणि मनसे (MNS) युतीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ही मनसेसाठी सोडली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु, दरवेळीप्रमाणे भाजप-मनसे युतीची चर्चा हवेतच विरणार, असे अनेकांना वाटले होते. मात्र, मंगळवारी रात्री राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याने दोन्ही पक्षांमधील युतीबाबत काहीतरी ठोस घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज ठाकरे हे दिल्लीत गेल्यानंतर थेट भाजप मुख्यालयात किंवा अमित शाह यांच्या निवासस्थानी जातील, अशी सूत्रांची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीत असल्याने लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत सामील करुन घेण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. यावेळी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्यासमोर काय प्रस्ताव मांडतात, हे पाहावे लागेल. राज ठाकरे ज्याअर्थी मुंबईची वेस ओलांडून दिल्लीला गेले आहेत, त्याअर्थी त्यांना भाजपकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळाले असावे. आता दिल्लीवारीत त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. आतापर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु, या भेटीगाठींपलीकडे दोन्ही पक्षांमधील युतीच्यादृष्टीने काही ठोस घडले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने भाजप-मनसे युती प्रत्यक्षात येऊ शकते.
राज ठाकरेंच्या महायुतीत येण्याने भाजपला काय फायदा?
राज ठाकरे हे अत्यंत प्रभावी वक्ते आहेत. मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पक्षाने टोलनाके बंद करण्यासाठी केलेले आंदोलन असो किंवा अलीकडच्या काळातील मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठीचे आंदोलन असो, राज ठाकरे यांच्या भूमिकेला जनमानसात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय, राज ठाकरे यांची तडाखेबंद भाषणं, त्यांची विरोधकांवर टीका करण्याची शैली आणि प्रभावी वक्तृत्त्वाच्या जोरावर आपला मुद्दा मतदारांना पटवून देण्याची क्षमता भाजपसाठी फायदेशीर ठरु शकते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात प्रभावी अस्त्र ठरु शकते. याशिवाय, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राजकारण करण्याची अपरिहार्यता राज ठाकरे यांना भाजपच्या आणखी जवळ घेऊन जाते. त्यामुळे भाजप आणि मनसेचे राजकारण परस्परांना अनुकूल ठरते. अशा परिस्थितीत भाजपसाठी राज ठाकरे हे दीर्घकालीन मित्र ठरु शकतात.
भाजपने दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडल्यास कोण मैदानात उतरणार?
राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर मनसेचा महायुतीत समावेश दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी मनसेचा दक्षिण मुंबईतील उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगली आहे. सद्यपरिस्थितीत राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मुंबईच्या राजकारणात ओळखीचा चेहरा असणाऱ्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय, शिंदे गट आणि भाजपमध्ये ज्याच्यावरुन वाद सुरु असलेला ठाणे मतदारसंघही मनसेला सोडला जाईल, अशी कुजबूज सुरु आहे.
आणखी वाचा