Raj Thackeray & Uddhav Thackeary: राज ठाकरेंनी 'दादू'ला शिवतीर्थवर बोलावलं, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच 'राजा'च्या नव्या घरी जाणार, गणपती बाप्पा दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणणार!
Raj Thackeray Invite To Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो.

Raj Thackeray Invite To Uddhav Thackeray मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गणेशोत्सवासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो. त्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना घरी बोलावले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर काहीवेळ थांबून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यानंतर राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतही गेले होते. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील घरी कधी जाणार, याची चर्चा रंगली होती. अखेर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना घरी बोलावले आहे.
राज ठाकरे हे यापूर्वी दादरच्या शिवाजी पार्कमधील कृष्णकुंज या वास्तूमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी आपला मुक्काम शेजारीच नव्याने उभारण्यात आलेल्या शिवतीर्थमध्ये हलवला होता. राज ठाकरे हे कलासक्त असल्याने त्यांनी शिवतीर्थ हे निवासस्थान सुंदर पद्धतीने सजवले आहे. राज ठाकरे याठिकाणी राहायला आल्यावर अनेक राजकीय नेते शिवतीर्थवर येऊन गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा आल्याने उद्धव ठाकरे हे कधीही शिवतीर्थवर आले नव्हते. मात्र, आता गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत. दरम्यान, काल मनसेचे नेते अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरेंना गणेशोत्सव निमंत्रणाबाबत विचारले असता तुम्हाला सरप्राईज मिळेल, असं आमित ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे 20 वर्षांनी गेले होते मातोश्रीवर-
हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते.यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री जात त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले होते. दोन दशकांपूर्वी राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे चाळीशीच्या मध्याकडे प्रवास करत होते. 2006 मध्ये मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे एकदाही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी मातोश्रीवर गेले नव्हते. दरम्यान, राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी कधी जाणार? याबाबत चर्चा रंगल्या होत्या.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
























