Raj Thackeray & Uddhav Thackeray: मनसेच्या गोटात उद्धव ठाकरेंशी युतीबाबत सकारात्मक वातावरण, फक्त एका गोष्टीमुळे निर्णय अडला; अविनाश जाधवांनी सांगितलं कारण
Shivsena & MNS alliance: दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत ही सगळ्यांची भावना, आम्हीदेखील पॉझिटिव्ह आहोत; ठाकरे गट- मनसे युतीवर अविनाश जाधवांचं सूचक वक्तव्य.

Uddhav Thackeray & Raj Thackeray: मराठी माणसाच्या हितासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, ही भूमिका सर्वप्रथम राज ठाकरे यांनीच मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती करण्याबाबत आमच्याकडे सकारात्मक वातावरण आहे. मराठी माणसाच्या हितासाठी सगळेच एकत्र आले पाहिजेत. मात्र, भूतकाळातील कटू अनुभवामुळे मनसेकडून (MNS) सध्या या युतीबाबत सावधपणे पावले टाकली जात आहेत, असे वक्तव्य मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadav) यांनी केले. ते गुरुवारी 'एबीपी माझा'शी बोलत होते. यावेळी अविनाश जाधव यांनी ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत सविस्तरपणे भूमिका मांडली.
गेल्या अडीच-तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे बदल झाला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे. परंतु, 2017 आणि 2014 साली आमचा अनुभव वाईट असल्याने आम्ही आमची पावलं शांतपणे टाकत आहोत. राज ठाकरे येत्या काही दिवसांमध्ये भूमिका घेतील. ती महाराष्ट्राच्या हिताची असेल, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. मी पुन्हा सांगतो,साहेब सकारात्मक आहेत. पण 2014 ला जो प्रकार घडला, उद्धव साहेबांनी स्वत: फोन केला, एकत्र येऊ सांगितलं, आम्ही एबी फॉर्म थांबवले, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही फोन करत होतो. यांच्या नेत्यांची वाट पाहत होतो. पण प्रतिसाद आला नाही. पुन्हा तेच घडू नये म्हणून सावध पावले टाकत आहोत. परंतु, मराठी माणसासाठी राज ठाकरे कुठल्याही टोकाला जायला तयार आहेत, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
Avinash Jadhav MNS: मराठी माणसाची इच्छा राज साहेबांपर्यंत पोहोचलेय, योग्यवेळी निर्णय घेतील: अविनाश जाधव
आम्हाला देखील अनुभव आहे की, आम्ही शाखेत बसले असताना अनेक ज्येष्ठ नागरिक येतात. ते सांगतात, राजसाहेबांना सांगा, दोन्ही भावांनी एकत्र आले पाहिजे. ही महाराष्ट्राची भावना राज साहेबांपर्यंत पोहोचली आहे. फक्त आम्ही जुन्या अनुभवामुळे घाबरत आहोत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी युतीविषयी सकारात्मक भाष्य केले आहे. राज साहेब ठाकरे योग्यवेळी पाऊल टाकतील. महापालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. तोपर्यंत आम्ही चाचपणी करु. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. तशीच आमचीही इच्छा आहे. प्रत्येक मराठी माणूस पॉझिटिव्ह आहे, त्यामध्ये आम्हीदेखील आहोत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.
आणखी वाचा
























