उपरे विरुद्ध स्थानिक वाद इरेला पेटला, मी सालगडी म्हणून सोलापूरकरांची सेवा करेन, राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेंना जशास तसं उत्तर
Ram Satpute On Praniti Shinde, Solapur Loksabha : भाजपने सोलापुरातून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उपरे विरुद्ध बाहेरचा असा वाद रंगलाय.
Ram Satpute On Praniti Shinde, Solapur Loksabha : भाजपने सोलापुरातून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उपरे विरुद्ध बाहेरचा असा वाद रंगलाय. राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात तुमचं स्वागत आहे, असं म्हणत भाजपचा उमेदवार बाहेरचा आहे, असं सागंण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राम सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदे यांचे वडिल आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे उदाहरण देऊन जोरदार हल्लाबोल केलाय. सोलापुरात राम सातपुते आणि भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रोड शो केला. यावेळी ते बोलत होते.
तेव्हा सुशीलकुमार शिंदे परके नव्हते का? राम सातपुतेंचा सवाल
प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते हे सोलापूरच्या बाहेरचे आहेत, असं पत्रातून अप्रत्यक्षपणे नमूद केलं. त्यानंतर राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिलय. राम शिंदे म्हणाले, सुशीलकुमार शिंदे अनेक मतदारसंघातून निवडणुकीला थांबले तेव्हा ते परके नव्हते का? असा सवाल राम सातपुतेंनी केलाय. माझ्या आईवडिलांनी इथे ऊस तोड मजूर म्हणून ऊस कापलाय, मी सालगडी म्हणून सोलापूरच्या जनतेची सेवा करेन, असंही आश्वासनही राम सातपुते यांनी सोलापुरच्या जनतेला केलं आहे.
प्रणिती शिंदे पत्रातून काय म्हणाल्या होत्या?
काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहत राम सातपुते यांचे स्वागत केले होते. प्रणिती शिंदे पत्रात म्हणाल्या, सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला होता. शिवाय पुढील 40 दिवस आपण लोकांचे प्रश्न आणि विकासाच्या मुद्यावरुन लोकशाहीने विचारांची लढाई लढू, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
राम सातपुते यांचे जय श्रीरामने उत्तर
प्रणिती शिंदे यांच्या पत्राला राम सातपुते यांनी पत्रातून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. काँग्रेस नेते हिंदूंना दहशतवादी आणि भगवा आतंकवाद म्हणत होते. या बाबी सोलापुरकर विसरणार नाहीत. येणाऱ्या काळात सर्व गोष्टींचा हिशोब होईल. मोदींनी विकासाची गंगा आणली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सोलापूरकर मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असं राम सातपुते यांनी पत्रात म्हटलं होतं.