Prakash Mahajan on Narayan Rane : नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप, आंदोलन करण्याआधीच प्रकाश महाजनांच्या घरी पोलीस दाखल, नेमकं काय घडलं?
Prakash Mahajan on Narayan Rane : पुन्हा आमच्याविरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिला होता.

Prakash Mahajan on Narayan Rane : मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाजन यांना धमकीवजा इशारा दिला. "पुन्हा आमच्याविरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन," असे त्यांनी म्हटले. यानंतर राणे समर्थकांकडून फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. तसेच, "उद्या जर का माझा अपघात झाला, तर याची सर्वस्वी जबाबदारी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल, असे त्यांनी म्हटले आहे. तर नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन आज आंदोलन करणार होते. मात्र या आंदोलनाआधीच प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत.
प्रकाश महाजन म्हणाले की, तुमच्यात हिंमत आहे ना तर राणे साहेबांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वतः यावे. मी येऊन उभा राहतो. मला घाणेरड्या शब्दात शिव्या देतात. या वयात मला माझ्या आई वरून शिव्या देतात. हेच संस्कार नारायण राणे साहेबांनी यांच्या कार्यकर्त्यांना दिलेत का? दुसऱ्याच्या नेत्याविषयी तुम्ही असभ्य भाषा वापरता आणि तुमच्या विषयी भाषा वापरल्यावर तुम्हाला राग येतो. मी 73 वर्षाचा माणूस आहे. मला आता जगण्याची काही इच्छा राहिली नाही.
...तर नारायण राणे जबाबदार
जनतेला कळू द्या की, कणकवलीत असेच किती लोकांचे खून झालेत, ते कोणी केलेले आहेत. पोलिसांना सुद्धा मी सांगू इच्छितो की, कोणीही पोलीस खात्यातले माणसं फोन उचलत नाहीत. त्यांचे वैयक्तिक माझे मेहुणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याशी संबंध होते. तुम्ही त्यांच्या भावाला घाणेरड्या शिवाय देत आहात. म्हणजे तुम्ही कोणाच्या आईला शिव्या देताय? उद्या जर का माझा अपघात झाला, कुठे दुर्दैवी घटनेने माझा मृत्यू झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर राहील. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दखल घ्यावी. मी पंतप्रधानांना देखील विनंती करत आहे की, आपल्या मंत्रिमंडळात कधीकाळी राहिलेली व्यक्ती मला अशा पद्धतीने धमकी देत आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंत्री नितेश राणे यांनी एका पक्षाचे 20 आमदार आहेत, तर दुसऱ्या पक्षाचे एकही आमदार नाही. तरीही त्यांच्याकडे अफाट ताकद आहे. आम्ही इतके घाबरलो आहोत की आता झोप येत नाही. ‘आपलं काय होणार?’ या विचाराने अंगाला घाम फुटतो, अशी टीका केली होती. राणेंच्या या विधानावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. “मी नितेश राणेंना गांभीर्याने घेत नाही. त्यांच्यात वैचारिक खोलीच नाही. त्यांची वैचारिक उंची ही उभं राहिल्यावर लवंगेसारखी आणि बसल्यावर विलायचीसारखी वाटते,” अशा शब्दांत महाजनांनी खरमरीत टीका केली. या टीकेनंतर नारायण राणे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत प्रकाश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे?
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विचारसरणीची पातळी, बुद्धिमत्ता आणि जनमानसातील प्रतिमा या तरुण वयातच सिद्ध केली आहे. निलेश, नितेश आणि नारायण राणे हे दूरच पण आमची वैचारिक उंची मोजणारे तुम्ही तरी कोण? आमच्या विचारांची उंची ही जनतेने ठरवलेली आहे. नितेश राणे हे लोकांच्या मतांवर तीन वेळा निवडून आले आहेत. तुम्ही किती वेळा निवडून आला आहात?जर तुम्ही राणेंच्या वाटेला गेला आहात, तर योग्य मार्ग दाखवण्याचं काम मी निश्चित करीन. निलेश आणि नितेश यांना निष्ठा शिकवण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासारख्या दीड दमडीच्या माणसांकडून तर नाहीच. प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. पुन्हा काही बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिला होता.
प्रकाश महाजनांच्या घरी पोलीस दाखल
दरम्यान, नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन हे आज छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकात आंदोलन करणार होते. मात्र महाजन यांच्या घरी पोलीस पोहोचले असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आणखी वाचा
























