Sharad Pawar : शरद पवारांच्या मूळ गावात काय परिस्थिती आहे? नांदवळचे नागरिक कोणाच्या बाजूला? वाचा ग्राऊंड रिपोर्ट
Satara Lok Sabha Election : दरवर्षी पवार कुटुंबीय न चुकता नांदवळच्या यात्रेला येत असतात, पण यंदा लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम असल्याने पवार कुटुंबीय प्रचारात व्यस्त असल्याचं दिसतंय.
Satara Lok Sabha Election : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ (Nandval Koregaon) हे शरद पवारांच मूळगाव. या गावची यात्रा सुरू आहे. यात्रेच्या निमित्ताने पवार कुटुंबीय नांदवळला येत असतात. यंदा मात्र लोकसभेच्या निवडणुकीमुळं पवार कुटुंबीयांना यात्रेला येणं शक्य नाही. पहिल्यांदाच पवार कुटुंबीय यात्रेला नसणार आहेत. 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार (Sharad Pawar) निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नांदवळ गावातील प्रसिद्ध म्हातोबा जोगुबाई मंदिरात नारळ फोडून केला होता. यंदा शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांच्या पक्षाचा उमेदवार या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे.
शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळेस आम्ही आमच्या म्हातोबा देवाला साकडं घातलं होतं आणि त्यानंतर लगेचच सगळं चांगलं झालं. शरद पवारांना राजीनामा मागे घेतला आता देखील कुटुंब एकत्र यावं म्हणून आम्ही म्हातोबा देवाला साकडं घालणार आहे असं एका नागरिकाने सांगितलं.
ही पहिली यात्रा आहे ज्या यात्रेला पवार कुटुंब यात्रेला येणार नाहीत. न चुकता प्रत्येक वर्षी पवार कुटुंबीय यात्रेला येत असत.
मतदानावर बहिष्कार टाकणार
सन 2009 पासून 2024 पर्यंत आमच्या भागातील वसना वांगणा पाणी प्रकल्प काम सुरू आहे, तो अद्याप पूर्ण झालेला नाही. आमच्या भागाचा वापर केवळ निवडणुकीसाठी केला जातो, त्यानंतर दुर्लक्ष केलं जातं. आमचा पाणी प्रश्न मार्गी लागत नसेल तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा मार्ग देखील आम्ही अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया एका नागरिकांना दिली.
अजितदादा सांगतील ते आम्ही करणार
अजित पवार यांनी आमच्यासाठी सर्वस्व केलेलं आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांना मतदान नाही. ते उमेदवार असते तर त्यांना या भागातून भरघोस मतदान दिला असत. 2009 साली इथे उभे होते त्यावेळेस सर्वात जास्त मतदान आमच्या गावाने त्यांना दिलेला आहे. आता अजित पवार यांनी कारभार हातात घेतला आहे. त्यामुळे ते सांगतील तेच आम्ही करणार असं एक नागरिक म्हणाला.
तरुणांनी कारभार हातात घेतला की जेष्ठांना बाजूला करायचं असाच अर्थ घ्यायचा का? असा प्रश्न विचारल्यानंतर एक नागरिक म्हणाला की, घरोघरी हेच सुरू आहे. ज्यावेळी मुलगा कारभार हातात घेतो त्यावेळी फार काही वडिलांना विचारलं जातं असं मला वाटत नाही. शरद पवार आमच्यासाठी देव माणूस आहेत. मात्र आता ते उमेदवार नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना मतदान देणार नाही. खर तर हा प्रश्नच आमच्यासाठी अवघड आहे की मतदान नेमकं कोणाला द्यायचं?
शरद पवार अजूनही लढताहेत
शरद पवार आज 84 वर्षांचे आहेत ते जोरदार सभा घेत आहेत. शरद पवार यांच्यामुळे आता मोदी, अमित शाह यांना सतत महाराष्ट्रात सभा घ्याव्या लागत आहेत. 84 वर्षाचे असून देखील तरुणांना लाजवेल असं काम ते करत आहेत. त्यामुळे त्यांना आमचा सलाम आहे आणि आमचं मतदान त्यांनाच असेल. चिन्ह संपलं तरी नवीन चिन्ह मिळवून ते लोकांच्या मनामनात त्यांनी उतरवलं आहे, याचा आम्हाला शरद पवारांचा अभिमान आहे. 80 टक्के जागा त्यांच्या निवडून येतील. कानपट्टीवर बंदूक ठेवली म्हणून त्यांच्यासोबतच्या लोकांनी वेगळी भूमिका घेतली. कदाचित लोकसभेनंतर चित्र वेगळा असू शकतं.
शरद पवार आणि अजित पवार एकच
राजकारणात दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं अशी परिस्थिती असते. अजित पवार, शरद पवार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला वेगळे चित्र दिसेल. राजकीयदृष्ट्या जागृत कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे. कोणत्या वेळी काय भूमिका घेतली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकावं. त्यांनी सध्याची भूमिका ठरवून घेतली असेल असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. त्यांच्या कुटुंबात नक्कीच काहीतरी ठरला असणार. सध्या ते वेगळे दिसत असले तरी ते वेगळे नाहीत, ते एकच आहेत.
आमचं मत विकासाला मत आहे, केंद्रात मोदी हवे असतील तर आमचं मत त्यांना देणे आम्हाला क्रमप्राप्त आहे असं एक नागरिक म्हणाला.
ही बातमी वाचा: